‘‘भारतीय खेळाडूंचे शिकण्याचे दिवस आता संपले आहेत, त्या ऐवजी सकारात्मक निकाल कसा मिळविता येईल याचा विचार माझ्या सहकाऱ्यांनी केला पाहिजे व त्यांच्याकडून यादृष्टीनेच कामगिरी करून घेणार आहे’’, असे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.
भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये दहा जूनपासून कसोटी सामना खेळणार आहे. बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी कोहली याची येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी कोहली म्हणाला, ‘‘आमच्या खेळाडूंनी भरपूर गोष्टी शिकल्या आहेत. नव्याने त्यांना काही शिकण्याची आवश्यकता नाही. आता सामन्यात विजय कसा मिळेल यावर भर देण्याची आवश्यकता आहे. संघ म्हणून कोणते ध्येय साकारायचे आहे, हे आमच्या खेळाडूंना माहीत आहे. आजपर्यंत जे काही शिकले आहे, त्याचा उपयोग संघास विजयाचे लक्ष्य कसे साकारता येतील याचा विचार होण्याची अधिक गरज आहे.’’
या दौऱ्यात भारतीय संघ एक दिवसाचे तीन आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार आहे. याबाबत कोहली याने सांगितले, संघ अतिशय समतोल आहे. खेळाडूंची तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे. या आघाडीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. संघातील प्रत्येक खेळाडू ताजातवाना आहे. संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. यापूर्वी स्थानिक सामन्यांमध्ये अनेक संघाचे मी नेतृत्व केले आहे, मात्र कसोटीत नेतृत्व करणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांपेक्षा तेथे खूपच वेगळी रणनीती वापरावी लागते. ऑस्ट्रेलियातील दौऱ्यात कर्णधारपदाचा अनुभव मला मिळाला आहे. तेथे मला खूप काही शिकावयास मिळाले आहे.
संघातील वातावरण खेळीमेळीचे कसे राहील यावर माझा भर राहणार आहे. सकारात्मक वातावरण असेल तर खेळाडूंचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. आम्ही काही ध्येय निश्चित केली आहेत. ती साध्य करण्यावर माझा भर राहणार आहे, असे सांगून कोहली म्हणाला, माझे कोणतेही वैयक्तिक ध्येय नाही. संघास विजय मिळवून देणे हेच माझ्यासाठी मुख्य ध्येय आहे. शतक झळकावण्याचे ध्येय साकार करताना संघाचा पराभव होत असेल तर हे शतक माझ्या दृष्टीने कमी महत्त्वाचे राहील. त्याऐवजी संघाचा विजय हीच माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट राहील.
भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी व संघटकांनी पंचांनी पक्षपाती निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. त्याचा कसोटी सामन्यावर काही परिणाम होईल काय, असे विचारले असता कोहली म्हणाला, ज्या काही गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत, त्या आता इतिहासजमा झाल्या आहेत. आम्ही फक्त या दौऱ्यातील सामन्यांवर लक्ष केंद्रित करीत आहोत. बांगलादेश खेळाडूंच्या मनातही कोणताही द्वेष राहिलेला नाही अशी मला खात्री आहे.

Story img Loader