आशियाई क्रीडा स्पध्रेला प्राधान्य द्यावे की डब्ल्यूटीए स्पध्रेला या धर्मसंकटात सध्या टेनिसपटू सानिया मिर्झा सापडली आहे. परंतु तिने फारशी चिंता न बाळगता हा निर्णय अखिल भारतीय टेनिस असोसिएशनच्या कोर्टात धाडला आहे.
शुक्रवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत मिश्र दुहेरीचे ग्रँड स्लॅम जिंकणारी सानिया भारतात परतली आहे. सोमदेव देववर्मन आणि रोहन बोपण्णा या खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पध्रेतून माघार घेतल्यामुळे सानियालासुद्धा याविषयी विचारणा करण्यात आली. याबाबत सानिया म्हणाली, ‘‘आशियाई क्रीडा स्पध्रेच्या तारखांमुळे पेच निर्माण झाला आहे. बीजिंग आणि टोकियो येथे होणाऱ्या दोन मोठय़ा स्पर्धा या कालावधीत होत आहेत. या दोन आठवडय़ांमध्ये डब्ल्यूटीए स्पर्धामध्ये बरेच गुण कमवता येतील. त्यामुळे कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे, याचा निर्णय घेणे कठीण झाले आहे. मी मात्र हा निर्णय टेनिस असोसिएशनवर सोपवला आहे. कारण हा निर्णय मला घेणे सध्या तरी कठीण जात आहे.’’
‘‘आशियाई स्पध्रेत सहभागी होण्यास धन्यता मानल्यास डब्ल्यूटीए हंगामाच्या अखेरीस त्याचा प्रभाव जाणवतो. देशासाठी मी आशियाई क्रीडा स्पध्रेला जाईन आणि खेळेन. परंतु हा निर्णय मी स्वत: घेणार नाही. मला निर्णय घेण्यासाठी साहाय्यक ठरावे, म्हणून तो मी टेनिस असोसिएशनकडे सोपवला आहे. मी त्यांच्याशी याबाबत बोलणी करीन,’’ असे सानिया म्हणाली.
‘‘टेनिसमधील भारताच्या पदकांच्या आशा मावळल्यात जमा आहेत. माझ्या खेळण्याने किती चांगला फरक पडेल हे मी सांगू शकणार नाही. परंतु आम्ही आमच्या वतीने सर्वोत्तम प्रयत्न करू,’’ असे सानियाने स्पष्ट केले.

Story img Loader