भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन एकदिवसीय सामन्यांसाठी दुखापतग्रस्त दीपक चहर ऐवजी डावखुरा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याची संघात निवड केली आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरची घोट्याच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे. लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. दीपक चाहर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) जाणार आहे आणि तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल, अशी माहिती बीसीसीआयने निवेदन जाहीर करत दिली आहे.
दीपकच्या घोट्याला वळण आले आहे पण ते तितकेसे गंभीर नाही. तथापि, काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यामुळे टी२० विश्वचषकाच्या स्टँडबाय यादीत दीपकला खेळवण्याची जोखीम पत्करायची की नाही, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. पण गरज भासल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल.
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने भारताकडून शेवटचा सामना फेब्रुवारीमध्ये खेळला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या एकदिवसीय सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. तसेच त्याने भारताकडून आतापर्यंत ४ एकदिवसीय सामने खेळताना ५ बळी घेतले आहेत. तसेच ४ कसोटी सामन्यामध्ये ६ बळी घेत २६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना त्याच्या नावावर २५ बळी घेतल्याची नोंद आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उद्याच्या सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. भारतासाठी उद्याचा सामना ‘करो या मरो’ अशा स्वरूपाचा आहे. आफ्रिकेने भारताचा नऊ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी सामना जिंकणं खूप गरजेचे आहे. भारताचा एक संघ टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला असून रोहित शर्मा त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारताचे कर्णधारपद भुषवित आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळली गेलेली एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.