चेल्सी आणि टॉटनहम हॉटस्पर यांच्यातील निर्णायक लढत पाहण्यासाठी जेमी व्हॅर्डीच्या घरी रियाद महरेझ, नीगोलो कँटे, कॅस्पर शेमेइशेल, वेस मॉर्गन असे एकेक करत लिस्टर सिटीचे सर्वच खेळाडू जमू लागतात.. प्रत्येकाने पिझ्झा बनवण्यासाठीचे काहीना काही साहित्य सोबत आणलेले असते.. चेल्सीच्या विजयावर किंवा बरोबरीतील निकालावर लिस्टर सिटीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब होणार होते आणि त्याचीच ही तयारी.. पण टॉटनहमच्या २-१ अशा आघाडीमुळे या पिझ्झा पार्टीवर विरजण घालावे लागणार असे वाटत होते.. मात्र ईडन हजार्डच्या निर्णायक गोलमुळे चेल्सीने सामना २-२ असा बरोबरीत सोडवला आणि लिस्टरचे सर्व खेळाडू पिझ्झाच्या पाककृतीला लागले.. आता प्रश्न असा होता की जेतेपदाचा जल्लोष, हा स्वत: पिझ्झा तयार करून करण्यापेक्षा ते दुकानातून मागवूही शकले असते.. पण खरी गंमत इथेच आहे.. लिस्टर सिटीच्या जेतेपदात जितका वाटा प्रशिक्षक क्लाउडीओ रॅनीइरी यांचा आहे, तितकाच या पिझ्झाचाही आहे!
इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) २०१४-१५ हंगामात स्पध्रेतून हद्दपार होण्याच्या मार्गावरून कसेबसे सावरलेल्या लिस्टर सिटीने एका वर्षांत असा कोणता गुरुमंत्र घेतला की त्यांनी विजयाचा जणू सपाटाच लावला. निगेल पिअर्सन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना लिस्टर सिटीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. मागील हंगामात त्यांनी १४वे स्थान पटकावून पुढील हंगामातील आपली जागा निश्चित केली, परंतु त्यांच्या या कामगिरीने दुखावलेल्या चाहत्यांनी लिस्टरची या स्पध्रेत खेळण्याची पात्रताच नसल्याचे खडे बोल सुनावले. संघमालकांही हा विषय गांभीर्याने हाताळत पिअर्सन यांना प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. प्रचंड दबावात असलेल्या लिस्टरच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक नावांची चाचपणी झाली आणि रॅनीइरी यांचे नाव पुढे आले. गेली अनेक वष्रे वेगवेगळ्या आणि अव्वल क्लबच्या प्रशिक्षकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रॅनीइरी यांनी सर्वप्रथम खचलेल्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. व्हॅर्डी, महरेझ, कँटे, कॅस्पर, मॉर्गन, लिओनाडरे उलोआ या गुणवंत खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास ते अव्वल संघांसमोरही आव्हान उभे करू शकतात, याची जाण त्यांना होती.. घडलेही तसेच! इटलीचे माजी खेळाडू रॅनीइरी यांच्या नियुक्तीमुळे क्लबमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले. क्लबमधील खेळाडूंमध्ये बदल सुचवण्यापेक्षा आहे त्या खेळाडूंकडून शंभर टक्के कामगिरी करून घेण्याचे हे परिवर्तन होते. संघातील प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिक चर्चा करून त्याला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी चोख बजावले आणि खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला. पण या विश्वासाला त्यांनी जोड दिली ती एका आमिषाची. आपले आक्रमण चांगले आहे, परंतु बचाव फळीत अजून सुधारणा हवी, याची जाण रॅनीइरी यांना होती. म्हणूनच त्यांनी खेळाडूंना पिझ्झाचे आमिष दिले. होय, हे खरे आहे! बचाव फळीतील त्रुटी सुधारण्यासाठी किंवा ती अधिक अभेद्य करण्यासाठीची त्यांची ही युक्ती होती. प्रतिस्पर्धी संघाला संपूर्ण सामन्यात एकही गोल करू न दिल्यास खेळाडूंना पिझ्झा पार्टीचे वचन रॅनीइरी यांनी दिले. सुरुवातीला खेळाडूंना हे गमतीशीर वाटले. लिस्टरने सदरलँडना ४-२ असे नमवून स्पध्रेत धमाकेदार सुरुवात केली खरी, परंतु त्यांच्या बचाव फळीत अनियमितता आढळत होती. त्यामुळे रॅनीइरी यांनी लढवलेली ही शक्कल. क्रिस्टल पॅलेसविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॅनीइरींनी खेळाडूंना हे आमिष दाखवले. त्या लढतीत त्यांनी १-० असा विजय मिळवून रॅनीइरी यांचा विश्वास सार्थ ठरवला. रॅनीइरी यांनीही वचनाप्रमाणे सामना संपल्यानंतर खेळाडूंना पिझ्झा पार्टी दिली. त्यांच्या या कृतीमुळे खेळाडूही अवाक् झाले आणि पुढील प्रत्येक सामन्यांत प्रतिस्पर्धीला गोल करण्यापासून रोखणे हे एकच कानमंत्र त्यांनी अंगीकारले आणि त्याचेच फलित म्हणून त्यांना १३२ वर्षांत पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावता आले. त्यांना हा विजय अधिक द्विगुणित करण्याची संधी होती, परंतु मँचेस्टर सिटीविरुद्ध त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जेतेपदाचा निर्णय चेल्सी आणि टॉटनहम यांच्या लढतीपर्यंत गेला. जेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रविवारी लिस्टर घरच्या मैदानावर एव्हर्टनविरुद्ध खेळणार आहे. तेथेही विजय मिळवून पुन्हा पिझ्झा पार्टी करण्याचा मोह त्यांना झाला असेल हेही निश्चित. लिस्टर सिटी अन् ईपीएल जेतेपद हा प्रवास खराच सर्वाना अचंबित करणारा असला तरी रॅनीइरी यांना खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची याचे तंत्र चांगलेच अवगत आहे. पुढील हंगामातही त्यात सातत्य राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com

 

स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com