ब्रिटिशांनी भारतावर १५०पेक्षा जास्त काळ राज्य केले. या काळात त्याने भारतीय नागरिकांना तुच्छ वागणूक दिली. मात्र, स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये या स्थितीमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. आज अशी स्थती आहे की, एक भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या मार्गावर आहे. अशातच भारतासाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट घडली आहे. इंग्लंडमधील एका क्रिकेट मैदानाला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला इंग्लंडमध्ये मोठा मान मिळाला आहे. लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे. शनिवारी (२३ जुलै) हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. लिसेस्टर क्रिकेट मैदानाचे नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली होती. त्यांनी ब्रिटिश संसदेत दीर्घकाळ लिसेस्टरचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
या सन्मानाबाबत गावसकर म्हणाले, “मला खूप आनंद झाला आहे. लिसेस्टरमधील एका मैदानाला माझे नाव देण्यात आले आहे. लिसेस्टरमध्ये क्रिकेला प्रचंड पाठिंबा मिळतो. माझ्यासाठी हा खरोखरच मोठा सन्मान आहे.” तर, खासदार कीथ वाझ म्हणाले, “गावसकर हे जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. ते केवळ ‘लिटल मास्टर’च नाही तर क्रिकेटमधील ‘ग्रेट मास्टर’देखील आहेत.”
हेही वाचा – २०२३ विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या होणार निवृत्त? रवि शास्त्रींचे मोठे वक्तव्य
गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. त्यांचा हा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडला. गावसकर यांनी भारतासाठी एकूण १२५ कसोटी सामन्यांमध्ये ३४ शतके झळकावलेली आहेत.
परदेशामध्ये गावसकर यांचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाला ‘सुनील गावस्कर फील्ड’ असे नाव देण्यात आलेले आहे. याशिवाय टांझानियातील जंजीबारमध्येही ‘सुनील गावसकर क्रिकेट स्टेडियम’ तयार केले जात आहे.