गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालेला आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै याकाळात दोन्ही संघादरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अप्टॉनस्टील काउंटी मैदानावर एक चार दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. एजबस्टन कसोटीपूर्वी झालेल्या या सराव सामन्यात इंग्लंडच्या २१ वर्षीय रोमन वॉकरने भारतीय दिग्गजांच्या नाकी नऊ आणले. रोमनने ११ षटकात अवघ्या २४ धावा देत भारतीय संघातील पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतने नाबाद अर्धशतक झळकावल्यामुळे भारताने लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी ६०.३ षटकांत आठ बाद २४६ धावा करता आल्या. पाऊस आणि खराब हवामानामुळे दिवसभरात १९.४ षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा श्रीकर भारत ७० तर मोहम्मद शमी १८ धावांवर खेळत होते.
भरतने १११ चेंडूंचा सामना करून आठ चौकार आणि एक षटकार लगावला. भरतने एक बाजू लावून धरलेली असताना दुसऱ्या बाजूला भारताची आघाडीची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताने पहिल्या ८१ धावांतच पाच गडी गमावले होते. इंडियन प्रीमियर लीगदरम्यान (आयपीएल) खराब फॉर्मशी झुंजणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (२५) आणि विराट कोहली (३३) यांनी पुन्हा निराशा केली. हे दोन्ही तारांकित फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
लिसेस्टरशायरचा युवा वेगवान गोलंदाज रोमन वॉकरने भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. रोमनेने एकट्याच्या बळावर अर्धा भारतीय संघ तंबूत परत पाठवला. त्याला गोलंदाज विल डेव्हिसने चांगली साथ दिली. डेव्हिसने दोन बळी घेतले. सर्व खेळाडूंना सरावाची संधी देण्यासाठी, भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लिसेस्टरशायरच्या संघाकडून खेळत आहेत. विशेष म्हणजे ज्या खेळपट्टीवर रोमन वॉकरला बळी मिळत होते त्याच खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहला एकही बळी मिळाला नाही.
जर श्रीकर भरतने चिवट खेळी केली नसती तर भारतीय संघ २०० धावांचा टप्पाही पार करू शकला नसता. पण, ऋषभ पंत संघात असल्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतला कसोटी सामन्यात खेळणे अशक्य आहे. त्याला बाहेर बसावे लागेल. पण संघ व्यवस्थापन आपल्यावर विश्वास ठेवू शकते, हे त्याने आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे.