खेळाडू कितीही महान असला, तरी शिस्त ही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे आणि जर कोणी बेशिस्तपणा करीत असेल, तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल याचा आदर्शच ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने दाखवून दिला आहे. अष्टपैलू खेळाडू व संघाचा उपकर्णधार शेन वॉटसन याच्यासह चार खेळाडूंना भारत दौऱ्यावर असतानाही डच्चू देत ऑस्ट्रेलियन मंडळाने संपूर्ण क्रिकेट क्षेत्रास सनसनाटी धक्का दिला आहे. संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे जगाच्या क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ जगातील अव्वल दर्जाचा संघ मानला जातो. भारतात सर्वसाधारणपणे क्रिकेट दौऱ्यावर येणाऱ्या संघाविरुद्ध अनुकूल खेळपट्टीच्या मदतीने फिरकी गोलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवायचे असा सर्वसाधारण अनुभव पाहावयास मिळतो. अर्थात काही वेळा खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारतास घरच्या मैदानावरही लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करील अशी खात्री होती कारण खेळपट्टय़ा फिरकीस अनुकूल करण्यात आल्या होत्या (आणि उर्वरित कसोटींमध्येही राहतील अशी अपेक्षा आहे). त्यानुसार भारताने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये एकतर्फी विजय मिळविला. या दोन्ही सामन्यांमध्ये अपेक्षेपेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी खूपच खराब कामगिरी केली. त्यांची लाजिरवाणी कामगिरी सर्व प्रसार माध्यमांच्या टीकेचे लक्ष्य बनली. ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी संघातील सर्व खेळाडूंबरोबरच संघ व्यवस्थापन, निवड समिती व ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ आदी सर्वावरच तोंडसुख घेतले. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वच आघाडय़ांवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अपयशी कामगिरीचा फायदा भारतास मिळाला.
पहिल्या दोन कसोटींमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे पुरते धिंडवडे उडाले. उर्वरित दोन कसोटींमध्ये विजय मिळवीत उरली सुरली अब्रू वाचविण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय ऑसी संघास नव्हता. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने पहिल्या दोन सामन्यांमधील कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले. त्याकरिता त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला पराभवाची तीन प्रमुख कारणे लिहावयास सांगितली. तसेच संघास विजय मिळविण्याबाबत काय उपाययोजना करावी याबाबतही आपले मत ठरावीक मुदतीत देण्यास सांगितले होते. वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा व मिचेल जॉन्सन यांनी व्यवस्थापनाचा हा आदेश फारसा गांभीर्याने घेतला नाही. त्यांनी खेळाडूंच्या बैठकीपर्यंत हा तपशील दिला नाही. संघ व्यवस्थापन व हे चार खेळाडू यांच्यातील संघर्षांची पहिली ठिणगी तेथेच पडली.
संघ व्यवस्थापन तसेच संबंधित क्रिकेट मंडळ यांनी प्रत्येक मालिकेसाठी व दौऱ्याकरिता काही नियमावली तयार केली असते. या नियमावलीचे पालन खेळाडूंनी करणे अपेक्षित असते. क्रिकेटमध्ये व्यावसायिकता आल्यानंतर आजकाल सर्वच क्रिकेट मंडळे एक वर्षांकरिता खेळांडूंबरोबर करार करतात. खेळाडूही भरघोस मोबदल्याची खात्री होत असल्यामुळे बिनदिक्कत या करारांवर सह्य़ा करतात. कराराच्या तपशिलात जात नाहीत. ऑस्ट्रेलियन मंडळानेही खेळाडूंबरोबर लेखी करार केला आहे. या करारानुसार खेळाडूंनी परदेशी दौऱ्यात कसे वर्तन ठेवले पाहिजे याची नियमावली तयार केली होती. त्यानुसार खेळाडूंनी वर्तणूक ठेवली पाहिजे असे अपेक्षित होते. ज्या चार खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली, या खेळाडूंनी या नियमावलीचे पालन केले नाही अशी कारणमीमांसा संघ व्यवस्थापनाने हकालपट्टी करताना दिली आहे. सराव सत्राच्या वेळी मैदानावर उशिरा येणे, खेळाडूंच्या बैठकीस उशिरा पोहोचणे, बैठकीत कपाळावर आठय़ा ठेवीत बसणे, बैठकीत हळू आवाजात उपहासात्मक कॉमेंट्स करणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे, खेळांडूंकरिता ठेवण्यात आलेल्या बसमध्ये दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा येणे व बसला उशीर करणे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंची तंदुरुस्तीबाबत जी काही काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत त्याचे पालन न करणे, सरावाच्या वेळी संघाचा जर्सी न घालता अन्य जर्सी घालणे, खेळाडूंकरिता ठेवण्यात आलेल्या वैद्यकीय व फिजिओच्या तपासण्या टाळणे आदी अनेक नियमांचे पालन या चार खेळाडूंनी केले नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली असा खुलासा संघ व्यवस्थापनाने केला.
खेळाडूंची हकालपट्टी करताना तो किती महत्त्वाचा आहे याचा विचार त्यांनी केला नाही. संघाची शिस्त ही अधिक महत्त्वाची आहे हाच विचार त्यांनी केला. वॉटसन हा या संघातील सर्वोत्तम अनुभवी अष्टपैलू खेळाडू परंतु त्यालाही डच्चू देताना तो संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे याचा विचार त्यांनी केला नाही. पॅटिन्सन याने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये गोलंदाजीत सर्वाधिक यश मिळविले असूनही संघ व्यवस्थापनानेही बेशिस्त वर्तनाबद्दल त्याची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखविले. जॉन्सन व ख्वाजा यांची कारकीर्द अद्याप खऱ्या अर्थाने सुरू झालेली नाही. त्यांना या मालिकेत संधीही मिळालेली नाही, तरीही शिस्तीस सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. संघ व्यवस्थापनाच्या या कृतीचे क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही समर्थन केले. संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क व संघाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांच्या निर्णयाची पाठराखण केली. अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी या निर्णयाबद्दल क्लार्क, ऑर्थर व क्रिकेट मंडळ यांच्यावर सातत्याने टीका सुरू केली आहे. चार खेळाडूंच्या हकालपट्टीमुळे दौऱ्यावरील संघ अडचणीत सापडला असला, तरी संघ व्यवस्थापनाने हकालपट्टीचा निर्णय कायम ठेवला. क्रिकेट मंडळानेही हकालपट्टीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
झाले गेले विसरून जाण्याचे ठरवीत ऑसी संघाने नव्या उमेदीने उर्वरित मालिकेस सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने शिस्तीबाबत धाडस दाखवीत अन्य संघांपुढे आदर्श निर्माण केला आहे. भारतीय संघातही अनेक वेळा बेशिस्तपणा दिसून येतो. श्रीलंकेच्या दौऱ्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह काही खेळाडू सराव सत्रास उपस्थित न राहता बाजारहाट करण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत मेजवान्यांचा आनंद घेणे, क्रिकेट मंडळाने तयार केलेल्या नियमावलींचे उल्लंघन करणे आदी घटना अनेक वेळा पाहावयास मिळतात मात्र हे खेळाडू मोठे असल्यामुळे त्यांच्यावर बेशिस्तपणाबद्दल कारवाई करण्याचे धाडस भारतीय संघ व्यवस्थापनाने दाखविलेले नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा हा आदर्श त्यांनी ठेवला पाहिजे. आपण संघाचा अविभाज्य घटक आहोत त्यामुळे आपण कसेही वागले तरी चालते,असे काही खेळाडूंना वाटत असते. खेळाडूंच्या या बेफिकीर वृत्तीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे तरच खऱ्या अर्थाने क्रिकेट क्षेत्र स्वच्छ होईल.

Story img Loader