बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिकेचे भवितव्य निश्चित करण्यासाठी घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. प्रक्षेपण हक्क, मालिकेचे ठिकाण या विषयी ठोस निर्णय घेण्यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांच्या पदाधिकाऱ्यांदरम्यान चर्चेची दुसरी फेरी लवकरच होणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने व्हावेत, असा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ठेवला आहे. केंद्र सरकारने या मालिकेला हिरवा कंदील दिला असला तरी बीसीसीआयने अद्याप या मालिकेसाठी औपचारिक मान्यता दिलेली नाही.
‘‘पुढील काही दिवसांत किंवा पुढील आठवडय़ात दोन्ही मंडळांदरम्यान चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. या मालिकेसंदर्भात अधिकृत निर्णय झालेला नाही. संसदेत या मालिकेच्या आयोजनासंदर्भात चर्चाही झाली आहे. विविध वाहिन्यांवर त्यावर उलटसुलट वादविवादही घडू लागले आहेत,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘या मालिकेसाठी उभय मंडळांदरम्यान प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. क्रिकेट या मुद्याभोवती ही चर्चा केंद्रित आहे. या मालिकेसाठी दोन्ही बोर्डाकडून अनेक गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दौऱ्यांच्या नियमावलीनुसार ही मालिका पाकिस्तानमध्ये आयोजित होणे अपेक्षित आहे. मात्र पाकिस्तानमध्ये ही मालिका आयोजित न झाल्यास तटस्थ ठिकाणी किंवा भारतात आयोजित करता येऊ शकेल का, सामने कुठे होणार यावर साधकबाधक चर्चा होईल.’’

बीसीसीआयची छोटय़ा शहरांत कसोटी सामन्यांची योजना
कसोटी सामन्यांसाठी क्रिकेटरसिकांना मैदानापर्यंत खेचणे हे सध्याच्या दिवसांत अतिशय आव्हानात्मक झाले आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भविष्यात छोटय़ा शहरांमध्ये कसोटी सामने आयोजित करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.

Story img Loader