काही महिन्यांपासून सचिनला धावांसाठी झगडावे लागत असून त्याने निवृत्ती घ्यावी, अशी ओरड सुरू आहे. यावर वेस्ट इंडिजचे माजी धडाकेबाज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स म्हणाले की, सचिन अजूनही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीचे ओझे लादू नका, निवृत्तीचा निर्णय त्यालाच घेऊ दे.
‘‘निवृत्तीचा निर्णय सचिनलाच घेऊ द्या, तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याने एकटय़ाने याचा निर्णय घ्यावा. सचिनच्या समोर जाऊन ‘तू उद्यापासून खेळू नकोस’ असे बोलण्याचे धारिष्ट मी करणार नाही,’’ असे रिचर्ड्स म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘सर्वानाच माहिती आहे की, मी सचिनचा चाहता आहे. त्याच्याकडून अजूनही चांगली कामगिरी होत आहे आणि तो ट्वेन्टी-२० मध्ये जागा मागतच नाही. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळायला द्यावे, मला अजूनही त्याचा खेळ पाहायला आवडेल. याचप्रमाणे सामन्याची तयारी कशी करावी हे सचिनकडे पाहून शिकण्यासारखे आहे. ’’

कोहली मला माझ्या फलंदाजीची आठवण करून देतो -रिचर्ड्स
विराट कोहलीला गुरुवारी आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रमाणपत्र मिळाले ते महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांच्याकडून. कोहलीची फटकेबाजी पाहताना मला माझ्या फलंदाजीची आठवण येते, असे उद्गार दस्तुरखुद्द रिचर्ड्स यांनी काढले आहेत. ‘‘विराटची फलंदाजी पाहायला मला आवडते. त्याला पाहताना मला माझ्या फलंदाजीची आठवण येते. मला त्याचा आक्रमकपणा, खेळाबद्दलची गंभीर भावना आवडते,’’ असे रिचर्ड्स म्हणाले.