लिएण्डर पेस आणि महेश भूपती या अनुभवी खेळाडूंशिवाय भारताने डेव्हिस चषक स्पर्धेत चायनीज तैपेई संघाविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्यामुळे या बुजुर्ग टेनिसपटूंकडे फारसे लक्ष न देता नव्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करायला हवे. सध्या नव्या दमाच्या खेळाडूंचा बोलबाला सुरू आहे, असे मत भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन याने व्यक्त केले.
आशिया-ओशियाना गटातील लढतीत तैपेईवर विजय मिळवल्यानंतर सोमदेव म्हणाला, ‘‘पेस आणि भूपतीने दिलेले योगदान विसरता कामा नये, पण त्यांचा जमाना आता संपला आहे. पेस या वर्षी राष्ट्रीय संघातून खेळण्याकरिता उपलब्ध असणार नाही. भूपतीच्याही अनेक समस्या सुरू आहेत. या खेळाडूंवर विसंबून राहणे चालणार नाही. आता युवा खेळाडूंवरच भारताचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे आता कर्णधाराच्या निवडीविषयी विचार करण्याची गरज आहे.’’
स्वत:च्या खेळाविषयी सोमदेवने सांगितले की, ‘‘जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनानुसार घडत असतात, त्या वेळी प्रत्येक जण आपली स्तुती करत असतो, पण गोष्टी मनाविरुद्ध घडू लागल्या की, हीच माणसे आपल्यावर टीका करू लागतात. माझ्या कारकिर्दीत मी कितपत यश संपादन केले, याला महत्त्व नाही. माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे, हे वारंवार सांगत आलो आहे. परतीच्या फटक्यांवर आक्रमक खेळ करण्याची नितांत आवश्यकता आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा