लेव्हरकूसेन : गतविजेत्या बायर लेव्हरकूसेन संघाची जर्मनीतील प्रतिष्ठेच्या बुंडसलिगा फुटबॉलमधील अपराजित्वाची मालिका अखेर खंडित झाली. लेव्हरकूसेनला आरबी लेपझिग संघाकडून २-३ अशी हार पत्करावी लागली. बुंडसलिगामध्ये लेव्हरकूसेनचा संघ तब्बल ३५ सामन्यांनंतर पराभूत झाला.
‘‘आम्हाला हा पराभव पचवणे अवघड जात आहे. सामन्यातील एकंदर कामगिरीकडे पाहता आम्ही पराभूत होणे हा योग्य निकाल नव्हता,’’ असे लेव्हरकूसेनचे प्रशिक्षक झाबी अलोन्सो म्हणाले. या सामन्यात लेव्हरकूसेनचा संघ २-० असा आघाडीवर होता. मात्र, बचावातील चुकांचा त्यांना फटका बसला. पूर्वार्धातील भरपाई वेळेत केव्हिन कॅम्पल, तर उत्तरार्धात आघाडीपटू लुईस ओपेन्डा (५७ आणि ८०व्या मिनिटाला) यांनी केलेल्या गोलमुळे लेपझिगने दमदार पुनरागमन करताना लेव्हरकूसेनला पराभवाचा धक्का दिला.
हेही वाचा >>>Paralympics 2024 : पॅरालिम्पिकच्या चौथ्या दिवशी मनीषा-नित्या उपांत्य तर राकेश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक
लेपझिगचा बचाव आणि प्रतिहल्ल्यावर भर होता. याउलट लेव्हरकूसेनने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ केला. मात्र, गोलच्या दिशेने तब्बल २७ फटके मारूनही त्यांना केवळ दोनच गोल करता आले. जेरेमी फ्रिमपॉन्गने (३८व्या मिनिटाला) लेव्हरकूसेनला आघाडी मिळवून दिली, तर अलेहांद्रो ग्रिमाल्डोने (४५व्या मि.) ती दुप्पट केली. यानंतर मात्र लेव्हरकूसेन संघ आपल्या खेळातील लय गमावून बसला. त्याच वेळी लेपझिगच्या आक्रमणाला धार आली.
पूर्वार्धातील भरपाई वेळेत मध्यरक्षक केव्हिन कॅम्पलने हेडरद्वारे गोल नोंदवत लेव्हरकूसेनची आघाडी कमी केली. उत्तरार्धात ओपेन्डाने आधी गोलकक्षाच्या आतून, मग बाहेरून दोन अप्रतिम गोल नोंदवत लॅपझिगला आघाडी मिळवून दिली.
तब्बल १५ महिन्यांनंतर…
लेव्हरकूसेनचा संघ तब्बल १५ महिन्यांनंतर बुंडसलिगामध्ये पराभूत झाला. २०२३-२४ च्या हंगामात त्यांनी एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले होते. त्यांनी अखेरचा पराभव मे २०२३ मध्ये पत्करला होता. त्यावेळी व्हीएफएल बोचम संघाने लेव्हरकूसेनला ३-० असे पराभूत केले होते.