विश्वविजेत्याला शोभेल अशा थाटात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने येथे रविवारी झालेल्या चायनीज ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशनपासून ते ५६ लॅप्स पूर्ण करेपर्यंत आघाडी कायम राखत चौथ्यांदा जेतेपद पटकावले.
यंदाच्या हंगामातील तीनपैकी दोन शर्यतींत हॅमिल्टनने जेतेपद पटकावून वर्षांची दणक्यात सुरुवात केली आहे. मात्र, यंदाही त्याला संघसहकारी निको रोसबर्गच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. अवघ्या ०.७१४ सेकंदाच्या फरकाने रोसबर्गचे जेतेपद हुकले आणि तो दुसऱ्या स्थानावर राहिला. हंगामातील दुसरी स्पर्धा मलेशियन ग्रां. प्रि. जिंकणाऱ्या फेरारीच्या सेबेस्टियन वेटेलला ०२.९८८ सेकंदाच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जेतेपदाचे चषक उंचावल्यानंतर हॅमिल्टन म्हणाला, ‘‘संघाने अप्रतिम कामगिरी बजावली. येथे जेतेपद पटकावून खूप आनंद वाटतोय. मलेशियन शर्यतीत अपयशी ठरलो होतो. त्यातून सावरत चांगली कामगिरी केल्याचा आनंद आहे. फेरारीने कडवी टक्कर दिली आणि जेतेपदाच्या ते अगदी जवळ होते, परंतु आमच्या संघाने चोख कामगिरी बजावली.’’ फेरारीच्या किमी रैकोनेन याने चौथे, तर विल्यम्स मर्सिडीजच्या फेलीप मासाने पाचवे स्थान पटकावले.
फोर्स इंडियाला गुण नाही
हंगामातील दुसऱ्या शर्यतीत सहारा फोर्स इंडियाला एकाही गुणाची कमाई न करता माघारी परतावे लागले. चायनीज ग्रां. प्रि. स्पध्रेत फोर्स इंडियाचा शर्यतपटू सर्गीओ पेरेज याला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागल़े, तर दुसरा शर्यतपटू निको हल्केनबर्ग याला शर्यत पूर्ण करता आली नाही. त्यामुळे फोर्स इंडियाला एकही गुण मिळाला नाही. ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. स्पध्रेत सात गुणांची कमाई करणाऱ्या फोर्स इंडियाला मलेशियन आणि शांघाई या दोन्ही शर्यतींत अव्वल दहामध्ये स्थान पटकावता आले नाही. १५व्या स्थानावरून शर्यतीत सुरुवात करणारा पेरेजला गुण पटकावण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आले. तो म्हणाला, ‘‘आम्ही संपूर्ण ताकदीने शर्यतीत उतरलो, परंतु अंतिम निकाल आमच्या बाजूने लागला नाही. नियोजित व्यूहरचनेनुसार आम्ही खेळ केला आणि तीन थांबे घेण्याचा आमचा निर्णय योग्य होता.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा