३०२ गुणांसह आघाडीवर; वेटेलकडून आव्हान

मर्सिडीज संघाचा शर्यतपटू लुइस हॅमिल्टन तिसऱ्या फॉम्र्युला-वन विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी होणाऱ्या अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीत कट्टर प्रतिस्पर्धी सेबॅस्टियन वेटेल याच्यावर मात केल्यास त्याची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. २०१४पाठोपाठ यंदाचे सत्र गाजवणाऱ्या हॅमिल्टनला फेरारीचा शर्यतपटू वेटेलकडून कडवे आव्हान मिळाले. हॅमिल्टनच्या खात्यात ३०२ गुण जमा असून वेटेल त्यामागे ६६ गुणांनी पिछाडीवर आहे. हॅमिल्टनचा संघ सहकारी निकोलस रोसबर्ग २२९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आपला आदर्श खेळाडू आर्यटन सेन्ना यांच्या पावलावर पाऊल टाकत हॅमिल्टनने २००८ व २०१४ मध्ये फॉम्र्युला-वन विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. गेल्या चार वर्षांत हॅमिल्टनने अमेरिकेच्या सर्किटवर तीन वेळा राज्य गाजवले आहे आणि यंदा त्याची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी झाल्यास त्याला पुन्हा विश्वविजेता बनण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. तसे घडल्यास तो ऑस्ट्रेलियाचा जॅक ब्रॅब्हॅम, निकी लॉडा, ब्रिटनचा जॅकी स्टीवर्ट, ब्राझीलचा नेल्सन पिक्यूट व सेन्ना यांच्या पंगतीत जाऊन बसेल. फ्रेंचच्या अ‍ॅलन प्रोस्ट आणि जर्मनीच्या वेटेल यांनी प्रत्येकी चार, तर अर्जेटिनाच्या जॉन मॅन्युएल फँगीओने पाच आणि जर्मनीच्या मायकेल शुमाकरने नऊ जेतेपदांवर नाव कोरले आहे.
हॅमिल्टनने कोणलाही गृहीत न धरता तिसरे जेतेपद निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. तो म्हणाला, ‘‘स्वत:ला पुरेसा वेळ देऊन येथे बाजी मारण्यासाठी कठोर परिश्रम घेणार आहे. तिसरे विश्वविजेतेपद हेच लक्ष्य डोळ्यांसमोर आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत दुसरे
लक्ष्य ठरवूच शकत नाही. ऑस्टीनच्या मार्गावर गाडी चालवणे मला नेहमी आवडते.’’

Story img Loader