मर्सिडिझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत ब्रिटन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या जेतेपदावर कब्जा केला. सहाव्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने तगडय़ा प्रतिस्पध्र्याना ३० सेकंदांनी मागे टाकत हे जेतेपद पटकावले. त्याचे हे ब्रिटनमधील दुसरे तर कारकिर्दीतील २७वे जेतेपद ठरले. या कामगिरीमुळे हॅमिल्टनने जगज्जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.
हॅमिल्टनचा सहकारी आणि जगज्जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या निको रोसबर्गला गिअरबॉक्समधील बिघाडामुळे २९व्या लॅपमधून शर्यतीतून माघार घ्यावी लागली. आता जगज्जेतेपदाच्या शर्यतीत हॅमिल्टन रोसबर्गपेक्षा चार गुणांनी मागे आहे. १४व्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या विल्यम्सच्या वाल्टेरी बोट्टासने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियो तिसरे स्थान पटकावले. किमी रायकोनेनच्या कारला अपघात झाल्यामुळे शर्यतीला एक तास उशिराने सुरुवात झाली होती. चौथ्या वळणावर कारवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्याला सर्किटवरूनच वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले होते. त्यामुळे पात्रता फेरीत सहावे स्थान पटकावणाऱ्या हॅमिल्टनला दोन स्थानांची बढती मिळाली होती. याचा पुरेपूर फायदा उठवत हॅमिल्टनने जेतेपद मिळवले.