मर्सिडीझ संघाने रविवारी मलेशियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत घवघवीत यशाची नोंद केली. ब्रिटनचा अव्वल ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन हा मर्सिडीझच्या यशाचा शिल्पकार ठरला. ५९ वर्षांनंतर पहिल्यांदाच मर्सिडीझ संघाने पहिले आणि दुसरे स्थान पटकावण्याची किमया साधली. या जेतेपदासह हॅमिल्टनने आठ महिन्यांपासूनचा जेतेपदांचा दुष्काळ संपवला.
अव्वल स्थानावरून (पोल पोझिशन) सुरुवात करताना हॅमिल्टनने मागे वळून पाहिले नाही. अव्वल प्रतिस्पध्र्याचे कोणतेही दडपण न घेता हॅमिल्टनने थाटात जेतेपदावर नाव कोरले. मर्सिडीझचा दुसरा ड्रायव्हर निको रोसबर्गनेही सुरेख कामगिरी करत संघाला दुसरे स्थान मिळवून दिले. चार वेळा जगज्जेता ठरलेल्या रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १९५५मध्ये फॉम्र्युला-वनमध्ये पदार्पण करणारा मर्सिडीझ संघ २०१०मध्ये पुन्हा फॉम्र्युला-वनमध्ये परतला होता. आता पहिले आणि दुसरे स्थान पटकावून आपण कोणत्याही संघाला मागे टाकू शकतो, हे मर्सिडीझने दाखवून दिले.
या शर्यतीवर मलेशिया विमान अपघाताच्या दु:खाचे सावट होते. विजय मिळवल्यानंतर मलेशिया एअरलाइन्सच्या एमएच-३७० विमानाला झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांना हॅमिल्टनने श्रद्धांजली वाहिली. या दुर्घटनेमुळे सेपांग इंटरनॅशनल सर्किट प्रेक्षकांनी ५० टक्के भरले होते.
फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने चौथ्या क्रमांकावर मजल मारली. सहारा फोर्स इंडिया संघानेही मोसमाच्या सुरुवातीलाच सुरेख कामगिरीची नोंद केली. फोर्स इंडियाचा ड्रायव्हर निको हल्केनबर्गने पाचव्या क्रमांकावर झेप घेण्याची किमया साधली. मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनने सहावे स्थान प्राप्त केले. विल्यम्सचा फेलिपे मासा आणि वाल्टेरी बोटास यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान मिळवले. मॅकलॅरेनचा केव्हिन मॅग्नसेन नववा तर टोरो रोस्सोचा डॅनियल क्वायट दहावा आला.
५९ साल बाद..मर्सिडीझची गरुडझेप!
मर्सिडीझ संघाने रविवारी मलेशियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत घवघवीत यशाची नोंद केली. ब्रिटनचा अव्वल ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन हा मर्सिडीझच्या यशाचा शिल्पकार ठरला.
First published on: 31-03-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton wins malaysian gp