मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून सलग पाचव्या आणि या मोसमातील १०व्या जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदासह ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत आपला सहकारी निको रोसबर्गला तब्बल २४ गुणांनी मागे टाकत हॅमिल्टनने विश्वविजेतेपदापर्यंत मजल मारली आहे.
ब्राझील आणि अबुधाबी या दोन शर्यती शिल्लक असून या मोसमापासून नियमांत बदल झाल्यामुळे अखेरच्या शर्यतीत दुप्पट गुण दिले जाणार आहेत. रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने २१४ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे. रोसबर्गने अमेरिकन शर्यतीत पोल पोझिशनपासून सुरुवात केली होती, पण त्याला हॅमिल्टनचा झंझावात रोखणे जमले नाही. हॅमिल्टनने कारकिर्दीतील ३२वे जेतेपद मिळवत फॉम्र्युला-वनमध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवणाऱ्या ब्रिटिश ड्रायव्हर्सचा विक्रम हॅमिल्टनने मागे टाकला. यापूर्वी हा विक्रम नायजेल मॅन्सेल यांच्या नावावर होता. आता हॅमिल्टनला दुसऱ्या विश्वविजेतेपदाचे वेध लागले आहेत. हॅमिल्टनने २००८मध्ये मॅकलॅरेनकडून खेळताना विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
विश्वविजेतेपदासाठी काँटे की टक्कर असताना रोसबर्गने हॅमिल्टनला कडवी लढत दिली, पण त्याला या मोसमात १०व्यांदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रिकार्डियोने तिसऱ्या स्थानावर मजल मारली. विल्यम्सचे फेलिपे मासा आणि वाल्टेरी बोट्टास यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त केले. फेरारीचा फर्नाडो अलोन्सो सहावा आला. रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मॅकलॅरेनचा केव्हिन मॅग्नूसेन आठवा, लोट्सचा पास्टोर माल्डोनाडो नववा आणि टोरो रोस्सोचा जीन-एरिक वर्गने दहावा आला. सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्ग आणि सर्जिओ पेरेझ यांना अनुक्रमे इंजिनमध्ये बिघाड आणि अपघातामुळे शर्यत अर्धवट सोडावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा