शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर घातलेली प्रवेशबंदी हा बालिशपणा असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शाहरूख हा काही दहशतवादी नाही, असे सांगून एकदा घटना घडली म्हणून बंदी घालणे अयोग्य असल्याचे राज म्हणाले. अशाच प्रकारचा सूर राजकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात असला तरी स्वत: शाहरूखने वानखेडेवर न येण्याचाच निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर शाहरूखने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकांशी केलेल्या हुल्लडबाजीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याला वानखेडेवर येण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. एकीकडे आयपीएलच्या सामन्यांना विरोध करणारे राज ठाकरे यांना अचानक शाहरूखच्या प्रेमाचे भरते कसे आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्याआधी काँग्रेस पक्षानेही शाहरूखची पाठराखण केली होती. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांना पत्र पाठवून शाहरूखला वानखेडे स्टेडियमवर प्रवेश देण्यात यावा, असे म्हटले होते. ‘‘एक कलाकार म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणूनही शाहरूखला देण्यात आलेली शिक्षा लोकशाही पद्धतीला धरून नाही,’’ असे सचिन सावंत यांनी एमसीएला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Story img Loader