WPL 2023 2nd Match RCBW vs DCW Updates:आयपीएलप्रमाणेच महिला प्रीमियर लीगमध्येही तेच दृश्य पाहायला मिळाले. आरसीबीच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघालाही मोसमातील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्या सामन्यात, केकेआरने आरसीबीविरुद्ध २२० पेक्षा अधिक धावसंख्या करत विजय मिळवला होता. तसेच डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे दिल्लीने आरसीबीविरुद्ध २२० पेक्षा अधिक धावा करून विजय मिळवला.
आरसीबी महिला संघाचा ६० धावांनी पराभव –
आरसीबीच्या महिला संघाला लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६० धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत २ गडी गमावून २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ निर्धारित षटकात ८ गडी गमावून १६३ धावा करू शकला. संघातील चार खेळाडूंनी ३० पेक्षा अधिक धावा केल्या. कर्णधार स्मृती मंधानाने ३५ धावा, अलिसा पेरीने ३१ धावा, हीदर नाइटने ३४ धावा आणि मेगन शटने नाबाद ३० धावा केल्या.
या संघाने पुरुष संघाचा पराभव केला –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पुरुष संघाला आयपीएलच्या पहिल्या सत्रातील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. २००८ च्या पहिल्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सने ३ गडी गमावून २२२ धावा केल्या होत्या.
ब्रेंडन मॅक्युलमने १५८ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ८२ धावांत सर्वबाद झाला. प्रवीण कुमारने १२० च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक १८ धावा केल्या. प्रवीणशिवाय एकाही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही.