लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दिग्गज खेळाडू संघांमध्ये असतानाही त्यांच्या अनुक्रमे अर्जेटिना व पोर्तुगाल या संघांना मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
ब्राझील संघाने अर्जेटिनाविरुद्ध रोमहर्षक लढतीत २-० असा विजय मिळविला. दिएगो तार्डेली याने दोन गोल करीत ब्राझीलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मेस्सीने या लढतीत पेनल्टी किकची हुकमी संधी वाया घालविली. बीजिंग येथे झालेल्या या लढतीचा आनंद पन्नास हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी घेतला. मेस्सीने नुकत्याच झालेल्या आंतर-क्लब लढतीत बार्सिलोनाकडून खेळताना लेव्हन्टी संघाविरुद्धही पेनल्टी किकची संधी दवडली होती.
दुसऱ्या चुरशीच्या लढतीत यजमान फ्रान्सने पोर्तुगाल संघावर २-१ असा निसटता विजय मिळविला. करीम बेन्झेमा याने सुरुवातीलाच फ्रान्स संघाचे खाते उघडले. पॉल पोग्बा याने दुसरा गोल करीत फ्रान्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ५१व्या मिनिटाला रोनाल्डो याला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र त्याने मारलेला फटका फ्रान्सच्या स्टीव्ह मन्दान्दा याने शिताफीने रोखला. पोर्तुगालचा एकमेव गोल रिकाडरे क्वारेस्मा याने पेनल्टी किकचा उपयोग करीत नोंदविला.
अन्य लढतीत चिली संघाने पेरू संघावर ३-० अशी मात केली. या सामन्यात चिलीचा खेळाडू गॅरी मेडेल याच्या तोंडावर रिनाल्डो क्रुझेदोचे कोपर बसल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. मेडेल याला त्वरित रुग्णालयात शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा