बार्सिलोना संघासाठी २०१४-१५ हा हंगाम अविस्मरणीय होता. कोपा डेल रे, ला लिगा व चॅम्पियन्स लीग या प्रमुख स्पर्धावर वर्चस्व गाजवणाऱ्या बार्सिलोनाच्या विजयात लिओनेल मेस्सीची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. क्लबसाठी चोख कर्तव्य बजावणाऱ्या मेस्सीला राष्ट्रीय संघाकडून खेळताना फार यश मिळालेले नाही. यंदा मात्र त्याने अर्जेटिनाचा कोपा अमेरिका स्पर्धेतील जेतेपदांचा दुष्काळ संपविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गुरुवारपासून कोपा अमेरिका स्पध्रेला सुरुवात होत असून अर्जेटिनाचे चाहतेही १९९३नंतर जेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी उत्सुक आहेत.
रविवारी बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने युव्हेंटस्ला नमवून चौथ्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद नावावर केले. या चारही विजयात मेस्सी हा प्रमुख भूमिकेत होता. याशिवाय मेस्सीच्या नावावर सात स्पॅनिश जेतेपदे आणि दोन क्लब विश्वचषक आहेत. तसेच त्याने चार वेळा वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताबही पटकावला आहे. ‘‘यंदा कोपा अमेरिका स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याचे आमचे लक्ष्य आहे’’, असा निर्धार मेस्सीने व्यक्त केला. कोपा अमेरिका स्पध्रेत अर्जेटिनाचा पहिला सामना  पॅराग्वे संघाविरुद्ध शनिवारी होणार आहे.
यंदाच्या हंगामात मेस्सीने स्पॅनिश अजिंक्यपद सामन्यांत ४३ गोल्स केले आहेत. तसेच ‘ला लिगा’ स्पध्रेच्या इतिहासात सर्वाधिक २८६ गोल्स त्याच्या नावावर आहेत आणि चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने ७७ गोल्स केले आहेत. मात्र, अर्जेटिनाकडून खेळताना त्याच्या गोलच्या आलेखाला उतरती कळा लागलेली पाहायला मिळते. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ९७ सामन्यांत केवळ ४५ गोल्स केले आहेत.
२००७ साली कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत ब्राझीलने ३-० अशा फरकाने अर्जेटिनाला हरवले होते आणि त्या पराभूत संघात मेस्सीचाही समावेश होता. त्यानंतर २०११साली उपांत्यपूर्व फेरीतच अर्जेटिनाला गाशा गुंडाळावा लागला होता. घरच्या मैदानावर उरुग्वेकडून झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे मेस्सीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा