विश्वचषकाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी, अर्जेटिनाचे दोन सुपरस्टार खेळाडू पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने संपूर्ण जगाने पाहिले. दोघेही जागतिक कीर्तीचे खेळाडू असल्याने ही मोठी घटना होती. पण बरोबर २० वर्षांपूर्वी दिएगो मॅराडोनाच्या वादग्रस्त शैलीमुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या होत्या. काही दिवसांनंतर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे मॅराडोनाची १९९४च्या विश्वचषकातून थेट मायदेशी रवानगी करण्यात आली होती. काही वर्षांनी मॅराडोनाला तेथील जनतेने माफ केले.
दोन दशकांनंतर आता मॅराडोनाचा वारसदार म्हणून मेस्सीकडे पाहिले जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी स्लोव्हेनियाविरुद्धच्या सराव सामन्यात मेस्सी उलटय़ा करताना आढळल्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या गेल्या. मॅराडोनाचा वारसदार ठरू पाहणाऱ्या मेस्सीची जीवनशैली मात्र मॅराडोनाप्रमाणे नव्हती. एका साध्या, सोज्ज्वळ खेळाडूसारखी मेस्सीची प्रतिमा. पण त्या सामन्यात अर्जेटिनासाठी मेस्सी सपेशल अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर टीका होणे स्वाभाविक होते. ‘निराश’ अशा शब्दांत अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनी प्रतिक्रिया दिली. मेस्सीचे बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांच्या मुखातून एकच शब्द निघाला तो म्हणजे, ‘दडपण’. काय घडतेय, ते मेस्सीलाही कळत नव्हते. जर जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच मेस्सी ब्राझीलमधून रिक्त हस्ते मायदेशी परतला, तर अर्जेटिनाची जनता त्याला कदापी माफ करणार नाही. मॅराडोनाने १९८६मध्ये अर्जेटिनाला दुसरा आणि शेवटचा विश्वचषक जिंकून दिला होता. पण मेस्सी पुन्हा अपयशी ठरला, तर त्याचे काही खरे नाही.
‘मॅराडोना हा उपद्व्यापी मुलगा होता, पण त्याच्या याच उपद्व्यापामुळे अर्जेटिनाने सुवर्णदिन पाहिले. मेस्सी हा आमच्यासाठी देवाप्रमाणे आहे, पण देशासाठी तो अद्याप काहीही करू शकला नाही,’ हे म्हणणे आहे ब्राझीलमध्ये विमानतळावर काम करणाऱ्या सार्बा डेरेन्टो या एका अर्जेटिनाच्या चाहत्याचे. तो म्हणतो, ‘‘माझा मित्र मेस्सी आपल्या जन्मगावी रोझारियोमध्ये परतला आहे. पण रोझारियोवासीय त्याच्या राष्ट्रीयत्वाविषयी शंका उपस्थित करू लागले आहेत.’’ मेस्सी रोझारियोमध्ये जन्मला असला तरी वयाच्या १३व्या वर्षीपासून तो ला मसिया या बार्सिलोनामधील आधुनिक अकादमीमध्येच प्रशिक्षण घेत आला आहे. त्याचे तंत्र आणि त्याची महानता, २१ जेतेपद आणि चार वेळा बलॉन डी’ऑर हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीचा पुरस्कार ही सर्व बार्सिलोनाचीच देणगी आहे. पण त्याने अर्जेटिनासाठी काही केले आहे का? ‘नाही’, हेच डेरेन्टोचे उत्तर.
२००५मध्ये १८ वर्षांच्या मेस्सीने नेदरलँड्समध्ये झालेल्या २० वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘गोल्डनबॉल’चा पुरस्कार पटकावतानाच आपल्या देशाला विजेतेपद मिळवून दिले होते. नऊ वर्षांनंतर मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मॅराडोनाने १९८६मध्ये अर्जेटिनाला ‘एकहाती’ विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावेळी मॅराडोनाचे वय होते २५. या वेळी अर्जेटिनाच्या नायजेरियाविरुद्धच्या सामन्याआधी मेस्सी वयाची २७ वर्षे पूर्ण करणार आहे. पण त्याला अद्याप अर्जेटिनासाठी चांगली कामगिरी करता आलेली नाही. जर्मनीत २००६मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रशिक्षक जोस पेकेरमन यांनी जर्मनीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेस्सीला बेंचवर बसवले आणि अर्जेटिनाला पेनल्टी-शूटआऊटमध्ये घरचा रस्ता पकडावा लागला. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेतही अर्जेटिनाला जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले. कारकिर्दीत बहरात असतानाही मेस्सीची जादू पाहायला मिळाली नाही. त्याला एकही गोल लगावता आला नाही. त्याउलट चार गोल झळकावणारा गोंझालो हिग्युएन अर्जेटिनासाठी हीरो ठरला होता.
वयाच्या २३व्या वर्षी मेस्सीला काही करता आले नाही, जर २७व्या वर्षीही तो देशासाठी काही करू शकला नाही तर ३१व्या वर्षी काय करणार? असा सवाल अर्जेटिनामधील ‘मुंडियाल’ या लोकप्रिय वृत्तपत्राने केला आहे. बोस्नियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्याआधी याच वृत्तपत्राने पहिल्या पानावर मेस्सीचा मोठा फोटो लावला असून त्याचे शीर्षक आहे ‘आता सर्व काही मेस्सीवरच अवलंबून!’ आता हाच मेस्सी विश्वचषकासह मायदेशी परतला, तर लोक त्याला डोक्यावर घेतील. पण तसे घडले नाही तर मेस्सीचे दैवत्व त्याच्या मायदेशातच फासावर चढवतील!

Story img Loader