करचुकवेगिरी प्रकरणी अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता असली तरी तो मात्र निर्धास्त आहे. आपला वकील हे प्रकरण मार्गी लावेल, असे मेस्सीला वाटते.करचुकवेगिरी प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना सप्टेंबरमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तो म्हणाला, ‘‘माझे वडील सर्व कारभार सांभाळत असल्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. माझे वकील आणि सल्लागार या गोष्टी व्यवस्थित हाताळतील, अशी आशा आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.’’ बार्सिलोनाशी करारबद्ध झालेल्या ब्राझीलचा आघाडीवीर नेयमारचे मेस्सीने संघात स्वागत केले. नेयमारविषयी मेस्सी म्हणाला, ‘‘नेयमार हा महान खेळाडू असून बार्सिलोना संघातील वातावरणाशी सुसंगत होताना त्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशी आशा आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पध्र्याना अडचणीत आणणारा अशी नेयमारची ख्याती आहे. नेयमारच्या कामगिरीचा बार्सिलोना संघाला भरपूर फायदा होणार आहे. मैदानाबाहेर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. व्यक्ती म्हणूनही नेयमार खूपच चांगला आहे.’’

Story img Loader