लिओनेल मेस्सीने २०१२ या वर्षांत विक्रमी ८६वा गोल नोंदविला. पण  बार्सिलोनासाठी ला लिगा आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्ध्रेची विजेतेपद जिंकणे आपल्याला अधिक महत्त्वाचे वाटते, असे मेस्सी अभिमानाने सांगतो.
जर्मनीच्या जेर्ड म्युलरने १९७२मध्ये वर्षभरात ८५ गोल नोंदविण्याचा पराक्रम दाखविला होता. अर्जेटिनाच्या मेस्सीने हा विक्रम मोडून विक्रमांच्या पुस्तकात आता आपले नाव लिहिले आहे. मेस्सीने पहिल्या सत्रातच दुहेरी गोल नोंदविल्यामुळे बार्सिलोनाला रिअल बेटिस संघावर २-१ असा विजय मिळविता आला. परंतु २५ वर्षीय मेस्सीला संघाचा विजय आणि विजेतेपद याचीच अधिक उत्सुकता होती.
‘‘विक्रम मोडणे नेहमीच चांगले असते, हे मी बऱ्याचदा म्हटले आहे. परंतु संघासाठी मिळविलेला विजय हा फार महत्त्वाचा असतो,’’ असे मेस्सीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘ मोसमाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा ला लिगाचे विजेतेपद मिळविणे, हे माझे पहिले लक्ष्य होते. याचप्रमाणे बॅलोन डीओर स्पध्रेचे सलग चौथ्यांदा अजिंक्यपद प्राप्त करण्याचेही मी ठरविले होते.’’