चार दिवसांपूर्वी ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक गोलांचा विक्रम रचणाऱ्या लिओनेल मेस्सीने आता चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अपोल निकोसिया संघाविरुद्ध हॅट्ट्रिक झळकावत मेस्सीने चॅम्पियन्स लीगमध्ये ७२ गोल झळकावण्याची करामत साधली. या सामन्यात बार्सिलोनाने अपोल संघावर ४-० असा दणदणीत विजय साकारला.
लुइस सुआरेझने २७व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर मेस्सीचा गोलधमाका चाहत्यांना पाहायला मिळाला. बार्सिलोना संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या मेस्सीने ३७व्या मिनिटाला गोलक्षेत्राजवळून गोल केला. त्यानंतर ५८व्या आणि ८७व्या मिनिटाला गोल लगावून त्याने हॅट्ट्रिक साजरी केली. यासह मेस्सीने सर्वाधिक ७१ गोल करणाऱ्या रिअल माद्रिदच्या राऊल यांचा विक्रम मागे टाकला. रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आता ७० गोलसह तिसऱ्या स्थानी आहे.
चार वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीने ला लीगा स्पर्धेत टेल्मो झारा यांचा २५१ गोलांचा ५९ वर्षांपासूनचा विक्रम मेस्सीने चार दिवसांपूर्वी मोडीत काढला होता. मेस्सी हा बार्सिलोना संघाला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वी आपण बार्सिलोना संघातच कायम राहणार आहे, असे सांगत मेस्सीने तर्कवितर्काना पूर्णविराम दिला होता. ‘‘फुटबॉलमध्ये अनेक वेळा अनपेक्षित वळणे येत असतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याविरुद्ध असतात. पण मी यापुढेही बार्सिलोना संघाचाच भाग असणार आहे,’’ असे मेस्सी म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2014 रोजी प्रकाशित
मेस्सीचा गोलविक्रम!
चार दिवसांपूर्वी ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक गोलांचा विक्रम रचणाऱ्या लिओनेल मेस्सीने आता चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
First published on: 27-11-2014 at 04:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi goal record