ला लिगा स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध विजयानंतर मी बार्सिलोनाचाच आणि निवृत्तीही इथेच स्वीकारणार, असे वक्तव्य करणाऱ्या मेस्सीने २४ तासांतच ‘यू टर्न’ घेतला आहे. प्रतिष्ठेच्या ‘बॅलॉन डी ऑर’ पुरस्काराच्या वेळी मेस्सीने बार्सिलोना सोडण्याचे संकेत दिले आहेत.
रोनाल्डोने ‘बॅलॉन डी ऑर’ पुरस्कारावर नाव कोरले. मेस्सीला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मेस्सीवर बार्सिलोना सोडण्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्या वेळी पुढच्या वर्षी कोणत्या संघात असेन कल्पना नाही, असे सूचक उद्गार मेस्सीने काढले. मेस्सी चेल्सी किंवा मँचेस्टर सिटी क्लबकडे जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
बार्सिलोनासाठी खेळतानाच मला फुटबॉलला अलविदा करायचा आहे आणि त्यानंतर माझ्या जन्मगावी असलेल्या नेवेल्स क्लबसाठी मला शेवटचे खेळायचे आहे, असे मेस्सीने सांगितले. मात्र पुढच्या वर्षी मी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करणार माहिती नाही. फुटबॉल विश्वात अनेक चढउतार असतात, त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते.
माझ्या वडिलांनी चेल्सी किंवा मँचेस्टर सिटी संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केल्याच्या बातम्या मी ऐकल्या आहेत. बार्सिलोना सोडण्याचा माझा तरी इरादा नाही, असे मेस्सीने स्पष्ट  केले. २० दशलक्ष युरो इतक्या प्रचंड रकमेची मागणी मेस्सीने केल्याने फारच मोजक्या क्लब्सना त्याला विकत घेणे परवडू शकते.