लिओनेल मेस्सी, नेयमार आणि लुइस सुआरेझ या बार्सिलोनाच्या त्रिकूटाने २०१४-१५ हंगामातील गोलचे शतक मंगळवारी पूर्ण केले. बार्सिलोनाने गेटाफेचा ६-० अशा फरकाने पराभव करून ला लीगा स्पध्रेच्या जेतेपदाचा तीन वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्याच्या दृष्टीने कूच केली.
गेटाफेविरुद्धच्या लढतीपूर्वी मेस्सी-नेयमार-सुआरेझ यांच्या खात्यात ९७ गोल्स जमा होते. गोल्सची शतकपूर्ती आणि बार्सिलोनाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या मेस्सी-थिएरी हेन्री-सॅम्युअल्स इटोस (९९ गोल्स) आघाडीपटूंचा विक्रम त्यांना खुणावत होता. त्यामुळे जराही वेळ न दवडता त्यांनी गेटाफेवर हल्लाबोल केला. ९व्या मिनिटाला मेस्सीने मिळालेल्या पेनल्टीवर ‘पानेंका स्टाइलने’ गोल करून बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २५व्या मिनिटाला सुआरेझने मेस्सीच्या पासवर गोल करून बार्सिलोनाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या आघाडीपटूंच्या विक्रमाशी बरोबरी केली. अवघ्या तीन मिनिटांच्या आत नेयमारने शतकी गोल मारला आणि मैदानावर या त्रिकूटाने बेभान जल्लोष केला. ३०व्या मिनिटाला झाव्ही आणि ४०व्या मिनिटाला पुन्हा सुआरेझ आणि ४७व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून बार्सिलोनाचा ६-० असा विजय निश्चित केला आणि जेतेपदाची दावेदारी आणखी भक्कम केली.
१०३ मेस्सी, नेयमार आणि सुआरेझ यांनी २०१४-१५ या हंगामात एकूण १०३ गोल्स केले असून त्यांनी २००८-०९ साली बार्सिलोनाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या मेस्सी-हेन्री-इटोस या आघाडीपटूंचा विक्रम मोडला.
११८ रिअल माद्रिदच्या करिम बेंझामा, ख्रिस्तियानो रोनाल्डो व गोंझालो हिग्वेन यांनी २०११-१२ या सत्रात ११८ गोल्स केले होते. त्यामुळे मेस्सी-नेयमार-सुआरेझ यांना आणखी एक विक्रम खुणावत आहे.
१ ५३ बार्सिलोनाने २०१४-१५ या हंगामात १५३ गोल्स केले आहेत.