अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने अखेर रविवारी रात्री त्याचे स्वप्न पूर्ण केले, ज्याची तो अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. त्याच्या ट्रॉफी संग्रहात जगातील सर्व विजेतेपदे होती ज्याची प्रत्येक फुटबॉलपटूची आकांक्षा असते परंतु त्याच्याकडे विश्वचषक पदकाची कमतरता होती आणि आता मेस्सीने कर्णधार म्हणून आपल्या देशाला तिसरा विश्वचषक जिंकून ही इच्छा पूर्ण केली आहे. यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता की अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा शेवटचा सामना आहे का? यावर खुद्द मेस्सीने मोठे वक्तव्य केले आहे.
फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने विजेतेपदावर कब्जा केला. अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने हे विजेतेपद तर पटकावलेच शिवाय गोल्डन बॉलचा पुरस्कारही जिंकला.
वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे
सामना संपल्यानंतर मेस्सीच्या निवृत्तीबद्दल किंवा कारकिर्दीच्या भवितव्याबद्दल तो काय बोलणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अर्जेंटिनासाठी फुटबॉल खेळणे थांबवणार नसल्याचे मेस्सीने सामन्यानंतर स्पष्ट केले. मेस्सीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, ”मी अर्जेंटिनासाठी कोपा अमेरिका चषक आणि विश्वचषक विजेतेपद फार कमी वेळात जिंकले. राष्ट्रीय संघात राहून मी जे करत आहे ते करण्यात मला आनंद आहे. आणि जगज्जेते असताना मला आणखी काही काळ माझ्या देशासाठी खेळायला आवडेल. मला हा चषक अर्जेंटिनाला घेऊन तुम्हा सर्वांसोबत आनंदोत्सव साजरा करायला आवडेल.”
अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने विश्वचषक स्पर्धेतील सर्वात रोमांचक विजेतेपदाच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक फ्रान्सच्या १०व्या क्रमांकाच्या एमबाप्पेने केली असली तरी अंतिम फेरीत दोन गोल करणाऱ्या अर्जेंटिनाच्या दहाव्या क्रमांकाच्या मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. आपल्या शेवटच्या विश्वचषकात मेस्सीने अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण केले.
मेस्सीने अनेक विक्रम केले
अर्जेंटिनाच्या विजयासह लिओनेल मेस्सीने अंतिम फेरीत इतिहास रचला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने दोनदा गोल्डन बॉल जिंकला आहे. विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरीसाठी दोनदा गोल्डन बॉल जिंकणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये जर्मनीकडून हरल्यानंतरही त्या विश्वचषकात लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल देण्यात आला होता.