मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे दोन महिने सक्तीची विश्रांती पदरी पडलेल्या लिओनेल मेस्सीने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केले. दोन गोल झळकावत मेस्सीने बार्सिलोनाच्या गेटाफेवरील विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या विजयासह बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे.
नोव्हेंबरमध्ये रिअल बेटिसविरुद्धच्या सामन्यात खेळताना मेस्सीला दुखापत झाली होती. या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने दोन महिन्यांकरता त्याला एकाही लढतीत खेळता आले नाही. दुखापतीतून सावरलेल्या मेस्सीने नेहमीच्या धडाकेबाज शैलीत खेळ करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. चार वेळा जागतिक सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरलेला मेस्सी आंद्रेस इनेस्टाच्या जागी बदली खेळाडू म्हणून अवतरला.
निर्धारित वेळ संपतानाच मेस्सीने शानदार गोल केला. अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल झळकावत मेस्सीने बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी नवव्या मिनिटालाच सेक फॅब्रेगासने बार्सिलोनातर्फे सलामीचा गोल केला.
यानंतर बार्सिलोनाचे आक्रमण थोपवण्यात गेटाफेने यश मिळवले. मध्यंतरानंतर फॅब्रेगासने आणखी गोल करत बार्सिलोनाला भक्कम आघाडी मिळवून दिली. या लढतीसाठी बार्सिलोनाच्या संघात सहा बदल करण्यात आले होते.