विक्रमाकडे कूच करणारा लिओनेल मेस्सीची आणि त्याला मिळालेली नेयमारची साथ यामुळे बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत नऊ जणांसह खेळणाऱ्या रायो व्हॅलेकानो संघावर २-० अशी सहज मात केली.
मेस्सीने ३५व्या मिनिटाला रायो व्हॅलेकानोचा गोलरक्षक अँटोनियो रॉड्रिगेझला चकवून गोल करत ला लीगा स्पर्धेतील २४९व्या गोलची नोंद केली. आता टेल्मो झारा यांचा १९५५पासून असलेला २५१ गोलांचा विक्रम मोडण्यासाठी मेस्सीला फक्त दोन गोलची गरज आहे. मेस्सीच्या गोलनंतर काही मिनिटांनी मेस्सीने ला लीगा स्पर्धेतील सातव्या गोलची भर घातली.
‘‘मेस्सी आणि नेयमार ही जोडी बार्सिलोनासाठी नशीबवान ठरली आहे. शनिवारच्या सामन्यातही या जोडीची कमाल पाहायला मिळाली,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिके यांनी सांगितले. सहा विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवत बार्सिलोनाने १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi scored his 249th league goal for barcelona