ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पावलावर पाऊल टाकत बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीनेही चार सामन्यांमध्ये तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद केली. मेस्सीच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने इस्पान्योल संघावर ५-१ असा दणदणीत विजय मिळवत ला लीगा फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या रिअल माद्रिदवर दडपण आणले आहे. रोनाल्डोने ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक २३ हॅट्ट्रिकचा विक्रम शनिवारी आपल्या नावावर केला. पण मेस्सीनेही २१ हॅट्ट्रिक झळकावत त्याला गाठण्याच्या दिशेने कूच केली. मेस्सीची हॅट्ट्रिक, गेरार्ड पिकने हेडरवर लगावलेला गोल आणि प्रेडो रॉड्रिगेझचा एक गोल यामुळे बार्सिलोनाने सहज विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने अॅटलेटिको माद्रिदला मागे टाकून दुसरे स्थान प्राप्त केले आहे. ‘‘मेस्सीच्या महानतेविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. अतिशय खडतर अशा सामन्यात दुसऱ्या सत्रात आम्ही कामगिरीत सुधारणा केली. मेस्सीने बार्सिलोना संघाला यशोशिखरावर नेऊन ठेवले आहे,’’ असे गेरार्ड पिक म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा