फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. कारण काही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी गतविजेते फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील, इंग्लंड आणि स्पेन हे संघ विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत. पण याच दरम्यान लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघासाठी एक विचित्र योगायोग घडताना दिसत आहे.
हा योगायोग खरा ठरला, तर यावेळी मेस्सीचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावू शकतो. मेस्सीसोबतचा हा विचित्र योगायोग पेनल्टीबाबत घडला आहे. खरेतर अर्जेंटिनाने या विश्वचषकात पोलंडविरुद्ध ग्रुप- सी मधला शेवटचा सामना खेळला, त्यात २-० असा विजय मिळवला होता.
अशाप्रकारे पेनल्टीबाबत विचित्र योगायोग घडला –
या तिसर्या सामन्यात लिओनेल मेस्सीला पेनल्टीची संधी मिळाली, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. मेस्सी हा सध्याच्या काळातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, तो त्याच्या संघातील सर्वात अनुभवी आणि स्टार खेळाडू आहे. अशाच प्रकारे अर्जेंटिनाचा प्रवास १९७८ आणि १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत होता.
त्यावेळीही या संघाच्या तिसऱ्या सामन्यात मारियो केम्पेस (१९७८) आणि दिएगो मॅराडोना (१९८६) या दोन स्टार खेळाडूंनी पेनल्टी चुकवली होती. यानंतर (१९७८, १९८६) अर्जेंटिनाने विजेतेपदावर नाव कोरले. यावेळीही तिसर्या सामन्यात मेस्सी पेनल्टीवर गोल करण्यात चुकला आहे.
अर्जेंटिनासाठी हा विचित्र योगायोग घडला –
१९७८: तिसऱ्या सामन्यात मारिओ केम्पेसची पेनल्टीवर गोल चुकला – अर्जेंटिना अंतिम फेरीत चॅम्पियन
१९८६: तिसऱ्या सामन्यात मॅराडोनाची पेनल्टीवर गोल चुकला – अर्जेंटिना अंतिम फेरीत चॅम्पियन
२०२२: लिओनेल मेस्सीने तिसऱ्या सामन्यात पेनल्टीवर गोल चुकला – अर्जेंटिना संघाचा प्रवास सुरूच आहे.
अर्जेंटिना ५ वेळा फायनल खेळला, दोनदा चॅम्पियन झाला –
आत्तापर्यंत अर्जेंटिनाच्या संघाने १९७८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. मेस्सीचा संघ तीन वेळा (१९३०, १९९०, २०१४) अंतिम फेरीत पोहोचून विजेतेपदापासून वंचित राहिला. हा संघ तीनही वेळा उपविजेता ठरला. गेल्या विश्वचषक २०१८ मध्ये अर्जेंटिना संघ १६ व्या क्रमांकावर राहिला होता.
हेही वाचा – Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
अर्जेंटिना संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी –
यावेळी फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्याने आपल्या गटातील तिसऱ्या सामन्यात रॉबर्ट लेवांडोस्कीच्या संघ पोलंडचा २-० असा पराभव केला. आता सुपर-१६ मध्ये अर्जेंटिनाचा सामना ४ डिसेंबर रोजी ग्रुप-डी मधील दुसरा संघ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.