फुटबॉलनंतर क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट हा मुलांचा खेळ आहे, असे म्हटले जायचे. मात्र, जगभरातील काही ‘फियरलेस लेडिज’ने क्रिकेटवर फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. आयलियन अॅश, शार्लोत एडवर्ड, मिताली राज, सारा टेलर, लिसा स्थळेकर, अंजुम चोप्रा, बेट्टी विल्सन यासारख्या महिला क्रिकेटपटूंनी मुलीदेखील तितक्याच ताकदीने क्रिकेट खेळू शकतात, हे सिद्ध करून दाखवले आहे. यांच्यापैकी एकीने तर आता आणखी एक इतिहास रचला आहे. भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची कमाल करून दाखवली आहे.

लिसा ही फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (एफआयसीए) पहिली महिला अध्यक्ष ठरली आहे. स्वित्झर्लंडमधील नियॉन येथे झालेल्या एफआयसीए कार्यकारी समितीच्या बैठकीत ४२ वर्षीय लिसाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. लिसापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी हे पद भूषवलेले आहे.

“कोविड-१९ महामारीनंतर एफआयसीएची ही पहिलीच बैठक होती. यावेळी आमच्या सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही लिसा स्थळेकरची पहिली महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही गोष्ट जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे,” अशी माहिती एफआयसीएचे कार्यकारी अध्यक्ष हीथ मिल्स यांनी दिली.

हेही वाचा – Ranji Trophy 2022 Final : मध्य प्रदेश २३ वर्षांचा दुष्काळ संपवणार की पुन्हा मुंबईच मैदान मारणार?

ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार असलेली लिसा स्थळेकर भारतीय वंशाची आहे. तिचा जन्म पुण्यात झालेला आहे. लिसाने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये १८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. लिसाने १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने दोन हजार ७२८ धावा केलेल्या आहेत. याशिवाय तिने फिरकीपटू म्हणून १४६ बळी घेतलेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. २०२१मध्ये लिसाचा ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश झालेला आहे.

Story img Loader