अँडी मरेने याच अमेरिकन खुल्या स्पर्धेत गेल्या वर्षी जेतेपदाला गवसणी घालत इतिहास घडवला होता. नोव्हाक जोकोव्हिचसारख्या दमदार प्रतिस्पर्धीवर मात करत मरेने इंग्लंडचा ग्रँडस्लॅम जेतेपदांचा ७६ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांची जेतेपदावरची सद्दी मोडून काढत मरेने आपल्या नावाची मोहोर उमटवली. मात्र हे वैभव केवळ एका वर्षांपुरतेच सीमित ठरले. कारण यंदाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्वित्र्झलडच्या स्टॅनिलॉस वॉवरिन्काने गतविजेत्या मरेला माघारी धाडले. नवव्या मानांकित वॉवरिन्काने तृतीय मानांकित मरेचा ६-४, ६-३, ६-२ असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली.
वॉवरिन्काने अफलातून खेळ केला. चेंडू मारण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. मला एकही ब्रेकपॉइंट मिळाला नाही, यावरूनच त्याचे वर्चस्व सिद्ध होते. त्याची सव्‍‌र्हिसही अचूक होती, मोठे फटकेही त्याने आत्मविश्वासाने मारले असे अँडी मरेने सांगितले.
१४६ ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये केवळ दुसऱ्यांदा मरेला पूर्ण सामन्यात एकही ब्रेकपॉइंट मिळवता आला नाही असे घडले. कोर्टवर असलेला वाऱ्याचा प्रभाव टाळत वॉवरिन्काने ४५ विजयी फटके लगावले.
या वर्षी झालेल्या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच २८ वर्षीय वॉवरिन्काने गाशा गुंडाळला होता. मात्र मरेवर मात करत ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर, मार्क रोसेट यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी वॉवरिन्काविरुद्धच्या १३ लढतींपैकी ८मध्ये मरेने विजय मिळवला होता, मात्र या वेळी नशीब आणि आकडेवारीने त्याला साथ दिली नाही.
ऑलिम्पिक सुवर्णपदक, २०१२ अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद, या वर्षी विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा मरे जबरदस्त फॉर्ममध्ये होता. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सामन्यांसाठी आवश्यक कणखरता, कुठल्याही क्षणी सामन्यात परतण्याची ताकद, प्रत्येक फटक्यामध्ये असलेली अचूकता आणि परिस्थितीनुरूप हे फटके लगावण्याची समज ही सारी मरेची गुणवैशिष्टय़े वॉवरिन्कासमोर निष्प्रभ ठरली.
अन्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिचने विजयी आगेकूच कायम राखली. अव्वल मानांकित जोकोव्हिचने २१व्या मानांकित मिखाइल युझनीवर ६-३, ६-२, ३-६, ६-० अशी मात केली आणि उपांत्य फेरीत स्थान पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वोत्तम टेनिस खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. अमेरिकन खुल्या स्पर्धेआधी हार्ड कोर्टवरची माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. परंतु मी माझ्या खेळावर काम करत आहे. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम टेनिस खेळण्याचा माझा प्रयत्न असेल असे जोकोव्हिचने सांगितले.
पहिला आणि दुसरा सेट जिंकत जोकोव्हिचने दमदार वर्चस्व दाखवले. मात्र त्यानंतर युझनीने तिसरा सेट जिंकत परतण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत सेट गमावण्याची जोकोव्हिचची ही पहिलीच वेळ होती. मात्र पुढचा सेट नावावर करत जोकोव्हिचने युझनीचे आव्हान संपुष्टात आणले.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची वॉवरिन्काची ही पहिलीच वेळ आहे. ‘उपांत्य फेरीत त्याच्यासमोर अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान आहे. माझ्यासाठी हा विजय संस्मरणीय आहे. गतविजेत्या खेळाडूला सरळ सेट्समध्ये नमवण्यासारखा आनंद नाही.
                – स्टॅनिलॉस वॉवरिन्का,
                 स्वित्र्झलडचा टेनिसपटू

Story img Loader