अजिंक्य रहाणेच्या झुंझार १२७ धावा आणि अश्विनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ३३४ धावांचा पाठलाग करताना द.आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १२१ धावांत गडगडला. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात २१३ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. फिरकीपटू रवींद्र जडेजाने आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले, तर उमेश यादव आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इशांत शर्मानेही एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
भारताला ३३४ धावांवर रोखल्यानंतर द.आफ्रिकेच्या संघाला रहाणेने केलेल्या वैयक्तिक १२७ धावसंख्येपर्यंत देखील पोहोचता आलेले नाही. आफ्रिकेचा पहिला डाव १२१ धावांतच आटोपला. पहिले पाच खेळाडू तर शंभर धावांच्या आतच माघारी परतले. त्यानंतर एबी डिव्हिलियर्यने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला दुसऱया बाजूने अपेक्षित साथ न मिळाली नाही. डीव्हिलियर्सने ४२ धावा केल्या. आफ्रिकेच्या डावाच्या सुरूवातीला एल्गरला(१७) चालते करून उमेश यादवने संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला, तर कर्णधार अमलासह बवुमा(२२), डू प्लेसिस(०), डीव्हिलियर्स आणि डेन पीट या पाच महत्त्वाच्या विकेट्स जडेजाने घेतल्या.
दरम्यान, आघाडीच्या फळीतील दिग्गज फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानंतर मैदानात टिच्चून उभ्या राहिलेल्या रहाणे सामन्याच्या दुसऱया दिवशी देखील चिवट झुंझ देत दमदार शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील रहाणेचे हे पाचवे, तर मायदेशातील पहिले शतक ठरले. पहिल्या दिवसाअखेरच्या ७ बाद २३१ अशा धावसंख्येला आकार देत रहाणे आणि आर.अश्विनने मैदानात जम बसवून ३०० धावांपर्यंत आगेकूच केली. रहाणे (१२७) बाद झाल्यानंतर नागपूर कसोटी आपल्या फिरकीने आफ्रिकन फलंदाजांना घायाळ केलेल्या अश्विनने यावेळी फलंदाजीचा अर्धशतकी नजराणा पेश केला. अश्विनने ५६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे अर्धशतक ठरले. अश्विन बाद झाल्यानंतर इशांत शर्मा आल्या पावलीच माघारी परतला आणि भारताने पहिला डावा ३३४ धावा उभ्या केल्या.
दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सुरू असलेल्या या चौथ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, मात्र आघाडीच्या फलंदाजांना या निर्णयाला न्याय देता आला नाही. भारताचा निम्मा संघ स्वस्तात बाद झाला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला तो फिरकी गोलंदाज डेन पीटने. चालू मालिकेत प्रथमच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या पीटने ३४ षटकांत १०१ धावांत ४ बळी घेत आपली छाप पाडली. वेगवान गोलंदाज कायले अ‍ॅबॉटने २३ धावांत ३ बळी घेतले. पण रहाणेने भारताचा डाव सावरून आपल्या नजाकती फटक्यांनी सामन्याला बहर आणला. समोरील बाजूने एकेक फलंदाज बाद होत असतानाही रहाणेने आपली एकाग्रता ढळू दिली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे तिसरे अर्धशतक ठरले. याचप्रमाणे चालू मालिकेतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा