दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील चौथ्या कसोटीत भारताने द.आफ्रिकेचा दुसरा डाव १४३ धावांत गुंडाळून तब्बल ३३७ धावांनी दणदणीत विजय साजरा केला आहे. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने द.आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशी खिशात टाकली आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे विजयाचा शिल्पकार ठरला. अजिंक्यने सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली. अजिंक्यला सामनावीराच्या, तर आर.अश्विनला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. द.आफ्रिकेवरील या विजयासह भारताने कसोटी क्रमावारीत दुसऱया स्थानी झेप घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने चौथी कसोटी अनिर्णीत राखण्याच्या इराद्याने अतिशय कूर्मगतीने फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर ‘हमला’ करणारा फलंदाज अशी ओळख जपणाऱ्या अमलाने अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारत २८८ चेंडूंत फक्त २५ धावा केल्या, तर एबी डीव्हिलियर्सने ३४५ चेंडूत ४३ धावा केल्या. अमला आणि डीव्हिलियर्शने मैदानात जम बसवल्याने भारतासमोर अडचण निर्माण झाली होती. रवींद्र जडेजाने अमलाला(२५) माघारी धाडले आणि भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, अमला बाद झाल्यानंतर एबी डीव्हिलियर्सने आपली एकाग्रता ढळू न देता मैदानात संघाची धुरा सांभाळली. मात्र, डीव्हिलियर्सला दुसऱया बाजूने अपेक्षित साथ मिळू शकली नाही. डू प्लेसिस(१०), तर ड्युमिनी भोपळा ही न फोडता माघारी परतला. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर तर द.आफ्रिकेचा संघ पूर्णपणे गडगडला.  भारताकडून आर.अश्विनने पाच, उमेश यादवने तीन, तर रवींद जडेजाने दोन विकेट्स घेतल्या.
भारताने द.आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान दिले होते. पण, ते गाठणे अशक्यप्राय असल्याने द.आफ्रिकेने बचावात्मक पवित्र्याने खेळणे स्विकारले. दरम्यान, रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही आपली छाप पाडली. रहाणेने २०६ चेंडूंत १०० धावा करताना कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावले. रहाणेने शतकाचा टप्पा गाठताच कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला होता.

Story img Loader