तिसऱ्या दिवशीच्या उपाहाराआधी अनुभवी कुमार संगकारा आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज तंबूत परतले होते. श्रीलंकेचा निम्मा संघ ९५ धावांत गारद झाल्यामुळे डावानिशी विजय शुक्रवारीच साजरा करण्याचे मनसुबे भारतीय संघाने आखले होते. परंतु या आशा-आकांक्षांवर विरजण घालण्याचे कार्य दिनेश चंडिमलने केले. त्याने प्रसंगावधान राखत जिद्दीने किल्ला लढवला आणि नाबाद १६२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला भारतापुढे पहिली कसोटी जिंकण्यासाठी १७६ धावांचे लक्ष्य समोर ठेवता आले. त्यानंतर दिवसअखेर भारताची १ बाद २३ अशी अवस्था झाल्यामुळे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर विजयाच्या उंबरठय़ावर कोण, या प्रश्नाचे उत्तर चौथ्या दिवशीच मिळू शकेल.
भारताने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतल्यामुळे श्रीलंकेने दडपणाखालीच दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. परंतु चंडिमलने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी पेश करून श्रीलंकेला दुसऱ्या डावात ३६७ धावसंख्या उभारून दिली. या खेळीने त्याने फक्त लंकेचा डावाने पराभवच टाळला नाही, तर संघाला पुरेशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आता सामना जिंकण्याची दोन्ही संघांना संधी आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यासाठी भारताला आणखी १५३ धावांची आवश्यकता आहे. भारताने सलामीवीर लोकेश राहुलला (५) गमावले आहे. रंगना हेराथने त्याला पायचीत केले. खेळ थांबला, तेव्हा शिखर धवन १३ आणि इशांत शर्मा ५ धावांवर मैदानावर होते.
२५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज चंडिमलने चिवट झुंज देताना लाहिरू थिरिमाने (४४) सोबत सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची आणि जेहान मुबारक (४९) सोबत सातव्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी झगडायला लावले. चंडिमलने आपल्या कारकीर्दीतील चौथे शतक झळकावताना १९ चौकार आणि ४ षटकार खेचले.
पहिल्या डावात ४६ धावांत ६ बळी घेत श्रीलंकेच्या डावाला सुरुंग लावणाऱ्या ऑफ-स्पिनर आर. अश्विनने दुसऱ्या डावात ११४ धावांत ४ बळी घेतले आणि सामन्यात दहा बळी घेण्याची किमया साधली. लेग-स्पिनर अमित मिश्राने ६१ धावांत ३ बळी घेतले, तर इशांत शर्मा, वरुण आरोन आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळवला.
सकाळच्या सत्रात भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने पहिल्या चेंडूंवर धम्मिका प्रसादला (५) करून श्रीलंकेची ३ बाद ५ अशी अवस्था केली होती. निवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या संगकारा (४०) आणि मॅथ्यूजने (३९) श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु उपाहारानंतर मात्र चंडिमलच्याच खेळीने सामन्याचे चित्र पालटले.
धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : १८३.
भारत (पहिला डाव) : ३७५.
श्रीलंका (दुसरा डाव) : दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. अश्विन ०, कौशल सिल्व्हा त्रि. गो. मिश्रा ०, धम्मिका प्रसाद झे. रहाणे गो. आरोन ३, कुमार संगकारा झे. रहाणे गो. अश्विन ४०, अँजेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. मिश्रा ३९, दिनेश चंडिमल नाबाद १६२, लाहिरू थिरिमाने झे. रहाणे गो. अश्विन ४४, जेहान मुबारक झे. रहाणे गो. हरभजन ४९, रंगना हेराथ झे. रहाणे गो. मिश्रा १, थरिंदू कौशल झे. साहा गो. इशांत शर्मा ८, न्यूवान प्रदीप त्रि. गो. अश्विन ३, अवांतर (नोबॉल ७, बाइज ३, वाइड ८) १८, एकूण ८२.२ षटकांत सर्व बाद ३६७
बाद क्रम : १-०, २-१, ३-५, ४-९२, ५-९५, ६-२२०, ७-३०२, ८-३१८, ९-३६०, १०-३६७
गोलंदाजी : आर. अश्विन २८.२-६-११४-४, अमित मिश्रा १७-२-६१-३, हरभजन सिंग १७-०-७३-१, वरुण आरोन ७-०-३९-१, इशांत शर्मा १३-०-७७-१
भारत (दुसरा डाव) : लोकेश राहुल पायचीत गो. हेराथ ५, शिखर धवन खेळत आहे १३, इशांत शर्मा खेळत आहे ५, एकूण ८ षटकांत १ बाद २३
बाद क्रम : १-१२
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद २-१-२-०, रंगना हेराथ ३-०-१३-१, थिरदू कौशल ३-१-८-०.

Story img Loader