सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३१९ अशी मजल मारली. सलामीवीर लोकेश राहुलने १९० चेंडूंत १०८ धावांची खेळी करून कसोटी कारकीर्दीतील आपले दुसरे शतक साजरे केले. तर विराट कोहलीने ७८ धावांची खेळी केली. रोहित शर्मानेही या सामन्यात ७९ धावांची दमदार खेळी केली. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरूवातीलाच भारताला अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांच्या रूपाने मोठे धक्के बसले. पहिल्याच षटकात मुरली विजयला तंबूत धाडून श्रीलंकेच्या धम्मिका प्रसादने श्रीलंकन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अजिंक्य रहाणे देखील स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे यजमानांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतर राहुलने तिसऱया विकेटसाठी कर्णधार कोहलीच्या साथीने १६४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत ७९ धावा केल्या. मात्र, आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही चेंडू बाकी असतानाच तो अँज्यूलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. श्रीलंकेकडून धम्मीका प्रसाद आणि रंगना हेरथने प्रत्येकी दोन, तर अँज्यूलो मॅथ्यूज आणि चमीराने प्रत्येक एक बळी घेतला.

Story img Loader