भारताच्या ३८६ धावांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्याचा मनसुबा ठेवणाऱया यजमानांना  इशांत शर्माने दोन धक्के दिले, तर उमेश यादवने करुणारत्नेची विकेट घेतली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेची ३ बाद ६७ अशी केविलवाणी अवस्था होती.
चौथ्या दिवशी उपहारानंतर भारतीय संघाचा दुसरा डाव २७४ धावांत संपुष्टात आला आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान उभे ठाकले. पण भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया श्रीलंकेच्या फलंदाजांना इशांतने मैदानात तग धरू दिला नाही. सलामीवीर थरंगाला इशांतने भोपळाही फोडू न देता तंबूत धाडले, तर उमेश यादवने करुणारत्नेला(०) बाद केले. त्यानंतर इशांतने सध्या चांगल्या फॉर्मात असलेल्या चंडीमलला(१८) कोहली करवी झेलबाद केले.
दरम्यान, दुसऱया डावात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि आर.अश्विनने अर्धशतकी खेळी केली, तर स्टुअर्ट बिन्नीने ४९ धावांचे योगदान दिले. नमन ओझा(३५) आणि अमित मिश्रा(३९) यांच्याही खेळी संघासाठी उपयुक्त ठरल्या. तिसऱया दिवसाअखेर ३ बाद २१ अशी केविलवाणी अवस्था असताना रोहित शर्माने मैदानात जम बसवून सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला अर्धशतक पूर्ण केले. मात्र, श्रीलंकेच्या धम्मिका प्रसादने रोहित शर्मा अर्धशतकावरच माघारी धाडले. तर कर्णधार कोहली देखील यावेळी मोठी खेळी करण्यास असमर्थ ठरला. कोहली २१ धावांवर बाद झाला. रोहित, कोहली माघारी परतल्यानंतर अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने संघाची कमान सांभाळली. संयमी फलंदाजी करीत स्टुअर्टने ४९ धावा केल्या. रोहित आणि बिन्नीच्या योगदानामुळे भारतीय संघाला समाधानकारक आघाडी घेता आली. नमन ओझाने(३५) स्टुअर्ट बिन्नीला साजेशी साथ दिली. अमित मिश्रानेही ३९ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून धम्मिका प्रसाद आणि प्रदीपने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू रंगना हेराथला एका विकेटवर समाधान मानावे लागले. उद्याचा दिवस हातात असलेल्या श्रीलंकेला विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान गाठण्यासाठी आक्रमक खेळी करावी लागेल, तर श्रीलंकेचा डाव त्वरित गुंडाळण्याच्या प्रयत्नात भारतीय गोलंदाज असतील. त्यामुळे सामन्याचा पाचवा दिवस रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader