झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमानांचा ५४ धावांनी पराभव केला. भारताने झिम्बाब्वेपुढे विजयासाठी १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, फिरकीपटू अक्षर पटेलच्या आणि हरभजन सिंग यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला १२४ धावांवर रोखले. अक्षरने १७ धावांत तीन तर हरभजनने २९ धावांत दोन बळी मिळवले. झिम्बाब्वेकडून हॅमिल्टन मसाकाझा आणि चामू चिभाभा यांनी अनुक्रमे २८ आणि २३ अशा सर्वाधिक धावा केल्या. या विजयामुळे भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
तत्पूर्वी या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरूवात धडाक्यात झाली होती. सलामीवीर मुरली विजय १९ चेंडूत ३४ धावांची झटपट खेळी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे ३३ धावांवर झेलबाद झाला. पहिले दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघाच्या धावसंख्येला मुरड बसली मात्र, रॉबीन उथप्पाने जबाबदारी फलंदाजी करीत नाबाद ३९ धावांची खेळी केली. मनिष पांडे(१९), केदार जाधव(९) आणि स्टुअर्ट बिन्नी (११) झटपट बाद झाले. अखेरच्या षटकांत हरभजनने फटकेबाजी करीत ३ चेंडूत ८ धावा केल्या.