महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या विजयाची नोंद करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. पहिल्या सामन्याप्रमाणाचे गोलंदाजांची भेदक कामगिरी हीच भारताच्या या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमानांची युझवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यासमोर चांगलीच भंबेरी उडाली. अनुभवी लुसी सिबांदाचे अर्धशतक वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज भारतीय गोलदांजीपुढे टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १२६ धावांत संपुष्टात आला. बरिंदर स्रान आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत युझवेंद्र चहलला योग्य साथ दिली. दरम्यान, १२७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली. के.एल. राहुल आणि करुण नायर या सलामीच्या जोडीने भारतीय संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. परंतु, त्यानंतर ५८ धावांवर के.एल.राहुल ५८ धावांवर बाद झाला. त्याने ५० चेंडूत ३३ धावा केल्या. मात्र, त्यानंतर करूण नायर आणि अंबाती रायडू यांनी ६७ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. विजयासाठी अवघ्या दोन धावा असताना करूण नायर ३९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मैदानावर आलेल्या मनिष पांडेच्या साथीने रायडूने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अंबाती रायडूने ४४ चेंडूत ४१ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून चामू चिभाभा आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

Story img Loader