ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत ५५ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. बांगलादेशवरील विजयासह पाकिस्तान ब गटात पहिला सामना जिंकून दोन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत २०१ धावा कुटल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला ६ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
(Full Coverage|| Fixtures||Photos)
पाकिस्तानकडून कर्णधार शाहिद आफ्रिदीने मौल्यवान कामगिरी केली. आफ्रिदीने १९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकांसह ४९ धावांची खेळी साकारली. याशिवाय बांगलादेशच्या दोन फलंदाजांनाही बाद केले. पाकिस्तानच्या अहमद शेहजाद(५२) आणि मोहम्मद हाफिजने(६४) दमदार फलंदाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर आफ्रिदने आपल्या धडाकेबाद अंदाजात फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला २०० चा आकडा गाठून दिला.
बांगलादेशने प्रत्युत्तर वीस षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता. अष्टपैलू शाकिब अल हसन (नाबाद ५०) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा मैदानात निभाव लागला नाही. पाकच्या मोहम्मद आमीर आणि आफ्रिदीने प्रत्येकी दोन, तर मोहम्मद इरफान आणि इमाद वसीम यांनी एक विकेट घेतली.

Story img Loader