झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची ३-० ने आघाडी
झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज रविवार भारत विरुद्ध झिम्बाब्वे दरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने सात विकेट्स राखून जिंकला आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने आघाडी घेत मालिकेच्या चषकावर भारताचे नाव कोरले आहे.
झिम्बाब्वेच्या १८३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु, गेल्या सामन्यापासून खराब फॉर्मात असलेल्या रोहीत शर्माला या सामन्यातही सुर गवसला नाही. रोहीत १४ धावांवर बाद झाला. पुढे शिखर धवन आपल्या वैयक्तिक ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर  पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारी खेळी साकारत अर्धशतक गाठले आणि भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला. कोहलीला सुरेश रैनानेही उत्तम साथ दिली.
सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱया भारताच्या या ‘यंगिस्तान’ने या सामन्यात दमदार सुरूवात केली होती, भारतीय गोलंदाजांना झिम्बाब्वेच्या सालामीफलंदाजांना बाद करण्यात यश आले. झिम्बाब्वे संघाची अवघी दोन धावसंख्या असताना संघाचे सलामीफलंदाज तंबूत परतले असल्याने झिम्बाब्वे संघ दबावाखाली खेळत होता. त्यानंतरच्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. परंतु, फलंदाजीचा ‘पावर प्ले’ संपताच विराट कोहलीने झिम्बाब्वेवर फिरकी गोलंदाजीचा मारा करण्याच्या उद्देशाने अमित मिश्रा आणि रविंद्र जडेजा यांच्या गोलंदाजीला सुरूवात केली. अमित मिश्राची गोलंदाजीची फिरकी पाहता झिम्बाब्वे संघ लवकरच गाशा गुंडाळणार अशी चिन्हे होती आणि अगदी झालेही तसेच मिश्राने झिम्बाब्वेच्या चार खेळाडूंना तंबूत धाडले. रविंद्र जडेजानेही झिम्बाब्वेच्या फलंदाजांना थोपवून धरले. सामन्याच्या ४६ व्या षटकात झिम्बाब्वे संघाचा खेळ १८३ धावांवर आटोपला.

Story img Loader