पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नायजरचे उपउपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात
आफ्रिकन देशांमधील फुटबॉल कौशल्याचा आस्वाद घेण्याची संधी घाना आणि नायजर यांच्याविरुद्धच्या लढतीतून नवी मुंबईकरांना मिळाली. चेंडूवरील ताबा राखण्याची कला, परंतु त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघाचे संरक्षण भेदून आक्रमण करण्याच्या रणनीतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दोन जेतेपद नावावर असलेल्या घानाने अखेरीस वरचढ खेळाच्या जोरावर २-० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर गतउपविजेत्या आणि आफ्रिका खंडातीलच माली संघाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे आणखी एका ‘आफ्रिकन डर्बी’ची मेजवानी गुवाहाटीमधील फुटबॉल प्रेमींसाठी असणार आहे.
साखळी फेरीत ब्राझील आणि स्पेन या मातब्बर संघांविरुद्ध खेळून परिपक्व झालेल्या नायजरने पहिली काही मिनिटे माजी विजेत्यांना चांगलीच टक्कर दिली. आफ्रिकेचे फुटबॉल म्हणजे आक्रमक खेळ आणि गोलवर्षांव, हे समीकरण. मात्र यावेळी उभय संघानी अतिआक्रमक खेळ न करता चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवण्यावर भर देण्याचे ठरवले. सुरुवातीला संथ वाटणाऱ्या या लढतीत प्रेक्षकांच्या वाढत्या उपस्थितीबरोबर रंग चढत गेला. घानाचे खेळाडू छोटे-छोटे पास देत चेंडू आपल्याकडे खेळता ठेवत होते. त्याचवेळी नायजरच्या बचावफळीला बेसावध करून पेनल्टी क्षेत्रात ते शिरकावही करत होते. मात्र, त्यांना इतका आटापीटा करूनही गोल करण्यात यश काही मिळत नव्हते. पहिल्या सत्रात घानाचा खेळ प्रभावी झाला. वारंवार गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचे त्यांचे कसब पदार्पणवीर नायजरला अचंबित करत होते. गोल करण्याच्या १३ प्रयत्नांपैकी त्यांना एकही यश मिळवता आले नाही आणि याचे श्रेय नायजरच्या बचावपटूंना नक्की द्यावे लागेल. नायजरकडून पहिल्या ४५ मिनिटांत गोल करण्याचा एकच प्रयत्न झाला. पहिल्या सत्रातील भरपाई वेळेच्या अखेरच्या क्षणाला फारुक इड्रीसाने पेनल्टी क्षेत्रात घानाच्या एरिक आयीआहला पाडले आणि पंचांनी त्वरित पेनल्टी स्पॉट किकचा इशारा दिला. त्यावर कोणतिही चूक न करताना एरिकने घानाचे खाते उघडले.
मध्यंतरानंतर घानाकडून वेळकाढूपणा सुरू झाला. खेळाडू वारंवार मैदानावर दुखापत झाली म्हणून वेळ घालवत होते. नायजर दुसऱ्या सत्रात आक्रमणाची धार तीव्र करेल असा अंदाजही फोल ठरला. त्यांना चेंडूवर अधिक काळ ताबा राखताच येत नव्हता. अनकेदा पेनल्टी क्षेत्रापर्यंत पोहचूनही आक्रमणपटूला चेंडू पास करण्यासाठी सहकारी खेळाडू शोधावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अंतिम स्वरुप मिळत नव्हते. दुसऱ्या सत्रातही त्यांच्याकडून गोल करण्याचे केवळ तीनच प्रयत्न झाले, तर घानाने १० प्रयत्न केले. ८६व्या मिनिटाला घानाला आणखी एक पेनल्टी स्पॉट किक मिळाली, परंतु यावेळी एरिकला गोल करण्यात अपयश आले. नायजरचा गोलरक्षक खालेद लवालीने डाव्या बाजूला झेप घेत एरिकने टोलावलेला चेंडू अडवला. त्याच्या या यशस्वी प्रयत्नानंतर नायजरच्या खेळाडूंनी मैदानावर जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. चार मिनिटानंतर मोहम्मद इड्रिसने कॉर्नरवरुन दिलेल्या पासवर बदली खेळाडू रिचर्ड डॅन्सोने ३० यार्डवरून चेंडू गोलजाळीच्या दिशेने टोलावला. यावेळी खालेदला चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधता आला नाही आणि घानाने २-० अशी निर्णायक आघाडी घेतली. सहा मिनिटांच्या भरपाई वेळेच्या अखेरच्या सेकंदात नायजरकडून प्रयत्न झाला, पण त्यांनी गोलची पाटी कोरीच राहिली.
भारतासमोरील आव्हान खडतरच होते
‘अ’ गटात भारताने ज्या प्रतिस्पर्धी संघांचा सामना केला, त्यापैकी घाना आणि अमेरिका यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यावरून भारतासमोरील आव्हान किती खडतर होते, याचा अंदाज बांधता येईल. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर होत असलेला कौतुकाचा वर्षांव हा योग्य असल्याचा सूर उमटत होता.
गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करूनही यश मिळवता आले नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यावर आम्ही मेहनत घेणार आहोत. मात्र आजच्या खेळाने समाधानी आहे. पेनल्टी स्पॉट किकमुळे आमचे मनोबल उंचावले. पुढील लढत मालीविरुद्ध आहे आणि आम्हाला एकमेकांचा खेळ चांगलाच माहीत आहे. – सॅम्युएल फॅबीन, घानाचे प्रशिक्षक
बचावामधील उणिवांचा आम्हाला फटका बसला, पण पहिल्याच प्रयत्नात इथपर्यंत मजल मारल्याने आम्ही समाधानी आहोत. गोलरक्षक खालीदने त्याची भूमिका चोख बजावली. या स्पर्धेची पात्रता मिळवणे हीच आमच्यासाठी ऐतिहासिक कामगिरी होती. त्याही पलीकडे जाऊन आम्ही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. – इस्माईल टिएमोको, नायजरचे प्रशिक्षक