दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघाचे आज आव्हान
आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी नसतानाही भारतीय संघाने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील पहिल्याच लढतीत बलाढय़ अमेरिकेला कडवी टक्कर दिली. मात्र केवळ झुंज देऊन चालत नाही, तर त्याचे विजयात रूपांतर करणे महत्त्वाचे असते, ही बाब भारतीय खेळाडूंना कळून चुकली असेल. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. सोमवारी हा संघ दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघाचा सामना करणार आहे. भारतीय संघ पुढील फेरीत प्रवेश करणे अशक्य आहे, याची जाण सर्वाना आहे. मात्र कोलंबियाविरुद्ध भारताने गोलचे खाते उघडावे, ही एकच अपेक्षा देशातील क्रीडारसिक करत आहेत.
अमेरिकेविरुद्धच्या लढतीतून बोध घेत भारतीय संघ नव्या जोशात कोलंबियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या लढतीतील भारताच्या खेळाचे सर्वाकडून कौतुक झाले. अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ यांनीही भारतीय खेळाडूंप्रति गौरवोद्गार काढले. भारताचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस यांनीही खेळाडूंचे कौतुक केले, परंतु त्याच वेळी त्यांचे कानही धरले. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ते उंचावलेल्या मनोबलाने कोलंबियाचा सामना करण्यासाठी आतुर आहेत. या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघाने सलग दोन दिवस कसून सराव केला. सरावात त्यांनी पहिल्या सामन्यातील चुकांवर लक्ष केंद्रित करून त्या सुधारण्यावर भर दिला.
- कोलंबियाने घानाविरुद्ध सर्वाधिक काळ (५९%) चेंडू ताब्यात ठेवला होता. याउलट भारताला अमेरिकेविरुद्ध चेंडू स्वत:कडे ठेवण्यात अपयश आले होते.
- शारीरिक तंदुरुस्ती ही पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळेच कोमल थाटल, सुरेश वांगजाम आणि संजीव स्टॅलिन यांना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर कुरघोडी करण्यात अपयश येत होते.
- तंदुरुस्तीच्या बाबतीत कोलंबियाही पहिल्या लढतीत असमर्थ ठरला आणि त्यामुळे भारतीय संघाला सुनियोजित रणनीतीने मैदानात उतरावे लागेल.
- गोलरक्षक धीरज मोइरांगथेमने जवळपास डझनभर गोल अडवले आणि कोलंबियाविरुद्ध त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.
- एटिल्सो मार्टिनेझला स्पर्धेतील पहिले पिवळे कार्ड मिळाले आणि भारताविरुद्ध त्याला वगळण्याची शक्यता आहे.