लिव्हरपूल  : प्रीमियर लीग फुटबॉलमधील रविवारच्या सामन्यात झेरदान शकिरीच्या दोन अफलातून गोलमुळे लिव्हरपूलने मॅँचेस्टर युनायटेडवर ३-१ अशी मात केली.

सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस होती. दोन्ही संघातील खेळाडूंनी अत्यंत वेगवान खेळ करीत प्रतिस्पध्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामन्यातील चुरस अधिकच वाढली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात बदली खेळाडू म्हणून शकिरी मैदानात आला. तोपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता. मात्र, शकिरीने ७३व्या मिनिटाला पहिला तर ८०व्या मिनिटाला दुसरा गोल करीत सामन्याचे पूर्ण चित्रच पालटून टाकले. त्याचे दोन्ही गोल लिव्हरपूलच्या विजयात निर्णायक ठरले.

युनायटेडची पीएसजीशी, लिव्हरपूलची बायर्नशी झुंज

स्वित्र्झलड : चॅम्पियन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील अंतिम १६ संघांच्या फेरीत मॅँचेस्टर युनायटेडची पॅरिस सेंट जर्मनशी (पीएसजी) तर लिव्हरपूल क्लबची बायर्न म्युनिकशी लढत होणार आहे. अन्य लढतींमध्ये रेयाल माद्रिदची झुंज अजॅक्सशी, बार्सिलोनाची लढत लिऑनशी होणार आहे. मॅँचेस्टर सिटीचा श्ॉलकेसमवेत, युवेंटसचा अ‍ॅटलेटिको माद्रिदशी, टोटनहॅम हॉटस्परचा बोरूसिया डॉर्टमंडशी आणि रोमाचा पोटरेशी सामना होईल.

मेसीच्या हॅट्ट्रिकने बार्सिलोनाचा विजय

माद्रिद : लिओनेल मेसीने ला लिगा फुटबॉलमधील त्याची ३१वी हॅट्ट्रिक नोंदवताना बार्सिलोनाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. लेवांटेवर ५-० असा मोठा विजय मिळवत तीन गुणांसह पदकतालिकेत क्लबला अव्वल स्थानी ठेवले आहे.सामन्यात प्रारंभी लुईस सुआरेझने ३५व्या मिनिटाला गोल करीत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना मेसीने पहिला गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात ४७व्या मिनिटाला आणि ६०व्या मिनिटाला अजून दोन बहारदार गोल करीत मेसीने त्याची हॅट्ट्रिक नोंदवली, तर सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये गेरार्ड पिकने गोल नोंदवत लेवांटेवर ५-० असा े दिमाखदार विजय नोंदवला.

 

Story img Loader