चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोला आणखी एक विक्रम खुणावत आहे. मंगळवारी सान्तिआगो बेर्नाबेऊ येथील घरच्या मैदानावर होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या साखळी सामन्यात रिअल माद्रिदला लिव्हरपूलशी सामना करायचा आहे. पण फॉर्मसाठी धडपडणाऱ्या लिव्हरपूलसमोर खरे आव्हान रोनाल्डोचे असणार आहे.
युरोपियन विजेत्या रिअल माद्रिदने दोन आठवडय़ांपूर्वी लिव्हरपूलचा ३-० असा पराभव केला होता. या सामन्यात गोल नोंदवणाऱ्या रोनाल्डोला आता चॅम्पियन्स लीगमधील रिअल माद्रिदच्या सर्वाधिक ७१ गोलांचा विक्रम मोडण्यासाठी एका गोलाची आवश्यकता आहे. रिअल माद्रिदने या सामन्यात विजय मिळवल्यास साखळी गटातील दोन सामने शिल्लक राखून ते ब गटातून अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवतील. लिव्हरपूलला दुसऱ्या स्थानासाठी एफसी बसे आणि चॅम्पियन्स लीगमध्ये पदार्पण कराणाऱ्या लुडेगोरेट्स रॅझग्रॅड यांच्याशी झुंज द्यावी लागेल.
या मोसमात सहावा पराभव पत्करणाऱ्या लिव्हरपूलसाठी रिअल माद्रिदविरुद्धचा सामना म्हणजे अग्निपरीक्षा असणार आहे. ‘‘संघाला यशोशिखरावर नेण्यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे मेहनत घेतली आहे. सध्या संक्रमणावस्थेतून जात असल्यामुळे आम्हाला अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. पण रिअल माद्रिदविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे. ब गटातून आगेकूच करण्याचे आमचे ध्येय आहे,’’ असे लिव्हरपूलचे प्रशिक्षक ब्रेंडन रॉजर्स यांनी सांगितले.
या मोसमात रिअल माद्रिदने पहिल्यांदाच ला लीगा फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गेल्या ११ सामन्यांत रिअल माद्रिदने तब्बल ४६ गोल लगावले आहेत. ‘‘आम्ही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या कामगिरीवर खूश आहोत. या मोसमाच्या सुरुवातीपासूनच आमची कामगिरी बहरली आहे,’’ असे रिअल माद्रिदचा मधल्या फळीतील खेळाडू लुका मॉड्रिकने सांगितले.

Story img Loader