ल्युईस सुआरेझच्या शानदार कामगिरीच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत कार्डिफ सिटीवर ३-१ अशी मात केली. सुआरेझने दोन गोल झळकावत या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या विजयासह लिव्हरपूलने गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. या सामन्यातील दोन गोलांसह सुआरेझने प्रीमिअर लीग स्पर्धेतील गोलांची संख्या १९ वर नेली आहे.
२५व्या मिनिटाला सुआरेझने पहिला गोल करत लिव्हरपूलचे खाते उघडले. रहीम स्टर्लिगने सुरेख गोल करत लिव्हरपूलची आघाडी वाढवली. ४५व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सुआरेझने मध्यंतराला लिव्हरपूलला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर कार्डिफतर्फे ५८व्या मिनिटाला जॉर्डन म्युचने एकमेव गोल केला. लिव्हरपूल तसेच सुआरेझला आणखी गोलची भर घालता आली नाही. मात्र कार्डिफचे आक्रमण यशस्वीपणे रोखत त्यांनी शानदार विजय साकारला.
कार्डिफचे व्यवस्थापक माल्की मॅकके यांच्या गच्छंतीच्या वृत्ताच्या पाश्र्वभूमीवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कार्डिफचा पराभव झाल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. कार्डिफ संघाचे मालक व्हिसेंट टॅन मॅकके यांना डच्चू देणार असल्याच्या वृत्तामुळे कार्डिफच्या चाहत्यांनी मॅकके यांच्या समर्थनार्थ बॅनरसह मैदानात घोषणाबाजी केली. मॅकके यांच्या मार्गदर्शनाखालीच कार्डिफला बढती मिळाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा