लीजेंड्स लीगचा पहिला क्वालिफायर इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना ४ गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या सामन्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनशी सामना करताना दिसत आहे. काही वेळाने या शाब्दिक युद्धाचेही हाणामारीत रूपांतर झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे, काही सेकंदांनंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यानंतर जॉन्सन पठाणला धक्काबुक्की करतो. या प्रकरणात, जॉन्सन हसत निघून जातो. यादरम्यान संघातील इतर खेळाडूंसह पंचांनाही मदतीला यावे लागते.
स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, रॉस टेलर (८४) आणि कॅरेबियन दिग्गज अॅश्ले नर्स (नाबाद ६०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर रविवारी जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियमवर लिजेंड्स लीग क्रिकेट पात्रता फेरीच्या रोमहर्षक सामन्यात इंडिया कॅपिटल्सने बाजी मारली. भिलवाडा किंग्जचा ४ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भिलवाडा किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२६ धावा केल्या, जे इंडिया कॅपिटल्सने तीन चेंडू बाकी असताना ६ गडी गमावून पूर्ण केले. श्रीसंतच्या चेंडूवर षटकार मारून नर्सने इंडिया कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले.