दोन महिन्यांवर आलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्याच दृष्टीने मोर्चेबांधणी शुक्रवारी झालेल्या ७९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिसून आली. एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेटमधील सर्वच प्रतिष्ठेच्या संघटनांचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या शरद पवारांची उपस्थिती सर्वाचेच लक्ष वेधणारी ठरली. याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, भाजप नेते आशीष शेलार या साऱ्या मंडळींची उपस्थिती ही आगामी निवडणुकीची चाहूल देणारीच होती. मागील निवडणुकीप्रसंगी पत्त्याच्या तांत्रिक कारणास्तव केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एमसीए निवडणुकीपासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे पवारांनी विलासराव देशमुख यांना पाठिंबा देत अध्यक्षपदी विराजमान केले होते. पण जून महिन्यात होणाऱ्या एमसीएच्या निवणुकीत सावधगिरी बाळगत पुन्हा पवार रिंगणात येणार की सत्तेची समीकरणे ठरविणारे ‘किंगमेकर’ होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. याचप्रमाणे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हेसुद्धा एमसीएच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा गेले वर्षभर कानावर पडत आहेत. आदित्य यांनी एमसीएच्या वार्षिक सभेला हजेरी लावून या चर्चाना खतपाणीच घातले आहे. याशिवाय आशीष शेलार आदी मंडळी क्रिकेटमधील राजकीय वर्तुळ अधिक रुंदावत होती.
मागील निवडणुकीत दिलीप वेंगसरकर गटाने मुंबईतील क्रिकेटपटूंसह आपली मोट बांधली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या गटाचे अनेक हुकमी चेहरे दिसून येत होते. याचप्रमाणे अनेक मंडळी गटातटाचे कार्य करत होती. याचप्रमाणे पवारांच्या उपस्थितीमुळे प्रा. रत्नाकर शेट्टी यांचा धीर खचला होता. गेली अनेक वष्रे संघटनात्मक क्रिकेटचा अनुभव असलेल्या शेट्टी यांनी आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपले स्थान बळकट राहावे, याकरिता अनेक हुकमी पत्ते खेळत सत्ताधाऱ्यांना पेचात पाडण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader