बीसीसीआयचे अध्यक्ष मनोहर मतदान करू शकत नाहीत ; एन. श्रीनिवासनही बीसीसीआयच्या पदापासून दूर; बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांचे अध्यक्षपद लांबणीवर
लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवले तर धुरीणांना मोठा हादरा बसू शकतो. या शिफारशींनुसार शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही. त्याचबरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. विद्यमान बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनाही यंदाचे सचिवपद भूषवता येणार नाही.
बीसीसीआयच्या पदाधिकारांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. पवारांचे वय सध्या ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना यापुढे बीसीसीआयमध्ये कोणतेही पद भूषवता येणार नाही. हा नियम जर स्थानिक संघटनांसाठी लागू करण्यात आला तर त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागू शकते. त्याचबरोबर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचेही वय ७१ वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांनाही बीसीसीआयमध्ये पद भूषवता येणार नाही. त्याचबरोबर सौराष्ट्रचे निरंजन शाह, पंजाबचे आय.एस. बिंद्रा आणि एम. पी. पांडोव यांचे वयही सत्तरच्या पुढे असल्याने त्यांनाही बीसीसीआयसाठी निवडणूक लढवता येणार नाही.
एका राज्याची एकच संघटना असायला हवी, जेणेकरून एका राज्याला बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये एकच मत देता येईल, अशी शिफारसही करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ तीन संघटना कार्यरत आहे. शिफारसीनुसार महाराष्ट्राची संघटना अधिकृत ठरवण्यात आली तर विदर्भ संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोहर यांना बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही. त्याचबरोबर पवार यांनाही मतदान करता येणार नाही. निरंजन शाह हे सौराष्ट्र संघटनेचे असल्याने त्यांनाही मतदार करता येणार नाही. महाराष्ट्र आणि गुजरातमधील मतांवर पवार यांचे मतदानाचे समीकरण बळकट होत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. त्याचबरोबर बीसीसीआयमध्ये बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा या तीन नवीन संघटनांचा अधिकृतपणे समावेश करावा लागेल. त्याचबरोबर नॅशनल क्रिकेट क्लब क्रिकेट खेळत नसल्याने त्यांनाही मतदान करता येणार नाही.
बीसीसीआयचे एक पद तीन वर्षांसाठी भूषवल्यावर काही वेळ त्यांना बीसीसीआयच्या पदापासून लांब राहण्याची शिफारस करण्यात आली आहे. यानुसार सध्याचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या अडचणी वाढतील. अध्यक्षपदासाठी उभे राहण्यासाठी त्यांना या पदाच्या कार्यकाळानंतर काही काळ बीसीसीआयच्या पदापासून लांब राहावे लागणार आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी एखादा व्यक्ती तीन वर्षांच्या दोन कार्यकाळासाठी राहू शकतो. यानुसार यापुढे शशांक मनोहर यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवता येणार नाही.
एका व्यक्तीने एकच पद भूषवावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार बीसीसीआय आणि स्थानिक संघटना या दोन्हींमध्ये एकाच पदावर कायम राहावे लागेल. यामुळे बीसीसीआयमधील अनुराग ठाकूर (अध्यक्ष, हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटना), बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी (अध्यक्ष, झारखंड क्रिकेट संघटना) आणि बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी (अध्यक्ष, हरयाणा क्रिकेट संघटना) यांनाच एका पदाचा त्याग करावा लागेल.
निवड समितीतील सदस्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केलेले असावे, अशी शिफारस आहे. त्यानुसार माजी क्रिकेटपटू गगन खोडाला निवड समिती सदस्यपद सोडावे लागेल. कारण खोडाने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पण अन्य निवड समिती सदस्य कायम राहू शकतील.
..तर बीसीसीआय अध्यक्षपदापासून पवार दूरच
बीसीसीआयच्या पदाधिकारांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे.
First published on: 05-01-2016 at 06:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lodha committee recommends bcci restructuring wants politicians out of cricket